राज्यात तसेच संपूर्ण देशात कोरोना संसर्ग वाढलाआहे. सध्या देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. रुग्ण वाढल्यामुळे राज्यातल ऑक्सीजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर हवाईमार्गे ऑक्सीजन वाहतूक करण्याविषयी तसेच कोव्हिड महामारीला नैसर्गिक आपत्ती घोषित करण्याची मागणी घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहले आहे. या पत्रातून ठाकरे यांनी गरीब आणि दुर्बल व्यक्तींना टाळेबंदीच्या काळात राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून सानुग्रह अर्थसहाय्य करण्यास मान्यता मिळावी याबाबत अशी मागणीदेखील नरेंद्र मोदी यांना केली आहे.
यावेळी उद्धव ठाकरे यापत्रामध्ये राज्यात कोरोना रुग्ण वाढल्यामुळे ऑक्सीजनचा तुटवडा भासतो आहे. या मुद्द्याकडे ठाकरे यांनी मोदींचे लक्ष वेधले आहे. "राज्यात मोठ्या प्रमाणावर चाचण्या होत असून रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत. 30 एप्रिलपर्यंत ही रुग्ण संख्या 11.9 लाखापर्यंत जाऊ शकते असा अंदाज आहे . मागील वर्षी सप्टेंबर 2020 मध्ये संपूर्ण देशात सक्रिय रुग्ण 10.5 लाख होते. राज्यात सध्या 5.64 लाख सक्रिय रुग्ण आहेत. अशा परिस्थितीत वैद्यकीय कारणासाठीच्या ऑक्सिजनचा निर्माण झालेला तुटवडा चिंतेची बाब आहे, . मात्र वेळ वाचविण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत या ऑक्सिजनची वाहतूक इतर मार्गांनी आणि त्यातही प्रामुख्याने हवाईमार्गे आणण्यासाठी तातडीने कार्यवाही होणे गरजेचे आहे" असे उद्धव ठाकरे यांनी आपल्या पत्रात म्हटलंय.
रेमडीसीव्हीरची निर्यात थांबविण्याच्या निर्णय केंद्र सरकारने घेतल्यामुळे मुख्यमंत्री ठाकरे यांनी मोदींचे आभार मानले आहेत. "इंडियन पेटंट ऍक्ट 1970 च्या कलम 92 नुसार या औषधांच्या निर्यातदारांना कायमस्वरूपी परवाने द्यावेत. ज्यामुळे ते रेमेडीसीव्हीर औषध स्थानिक बाजारपेठेत विकू शकतील," अशी मागणी ठाकरे यांनी आपल्या पत्रात केली आहे.
अनेक लघु उद्योग, स्टार्ट अप्स, व्यवसाय यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांत बँकांकडून कर्जे घातली आहेत. सध्याच्या परिस्थितीत त्यांची ओढाताण होते आहे. निर्बंधांमुळे त्यांच्यावर आर्थिक ताणदेखील पडत आहे. या गोष्टीचा विचार करुन ठाकरे यांनी वरील उद्योजकांकडून कर्जाचे हफ्ते घेऊ नयेत, असं त्यांनी म्हटलं आहे. "चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत लघू उद्योग, स्टार्ट अप्स, व्यवसायिक यांच्याकडून हप्ते स्वीकारण्यात येऊ नयेत अशा सूचना बँकांना द्याव्यात," अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी मोदींकडे केली आहे.