सूरज दाहाट, अमरावती | अमरावती जिल्ह्यातील तिवसा पंचायत समितीमध्ये कार्यरत असलेल्या रोजगार हमी योजनेच्या अधिकाऱ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. प्रमोद निंबोरकर असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. खळबळजणक म्हणजे यात मृत्युपूर्वी त्यांचे उपजिल्हाधिकारी राम लंके यांच्याशी फोन वरून संभाषण झाले होते. या संदर्भातल्या ऑडिओ क्लीपने खळबळ उडाली आहे.
अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील प्रमोद भिमरावजी निंबोरकर हे पंचायत समिती तिवसा येथील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना विभागात तांञिक अधिकारी म्हणुन कार्यरत होते.दरम्यानच्या काळात पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चेतन जाधव यांनी निंबोरकर यांच्या कार्यमुक्तीचा प्रस्ताव रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी राम लंके यांना पाठविला होता.राम लंके यांनीही कुठलीही शहानीशा न करता व निंबोरकर यांना बाजू मांडण्याची संधी न देता जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर करून या अधिकाऱ्याला काही महिन्यांपूर्वी कार्यमूक्त केल्याचा आरोपही उपजिल्हाधिकारी राम लंके यांच्यावरही लावण्यात आला आहे.
तिवसा पंचायत समितीमधील रोजगार हमी योजना विभागात कंत्राटी असलेले तांत्रिक अधिकारी प्रमोद निंबोरकर यांचा वरुडच्या बेनोडा पोलिस स्टेशन अंतर्गत मोर्शि ते वरूड रोडवर रात्री अपघाती मृत्यू झाला. दरम्यान निंबोरकर यांच्या मृत्यूने खळबळ माजली आहे. रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी राम लंके यांना फोन करून गटविकास अधिकाऱ्यांनी नोकरीवरून कार्यमुक्त केल्याने तणावाखाली येऊन आत्महत्या करत असल्याचे सांगितल्यानंतर काही तासातच या अधिकाऱ्याचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे.मात्र हा अपघात की तणावाखाली येऊन आत्महत्या असा प्रश्न निर्माण झाला आहे.दरम्यान या घटनेने अमरावती जिल्ह्यात खळबळ माजली आहे.
कामात अनियमितता असल्याने बीडिओ यांनी दिलेल्या कार्यमुक्तीचा प्रस्ताव माझ्याकडे आला होता. त्यानुसार त्यावर मी सही करून तो प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनादेखील पाठविला होता. आत्महत्या करू नको, असे मी त्याना वारंवार सांगितले. त्यांनी आत्महत्या केली नाही. त्यांचा अपघात झालेला आहे. त्यांना न्याय मागण्यासाठी अपील करण्याचाही सल्ला आम्ही दिला होता. तशी प्रक्रिया ही सुरू झाली होती, असे उपजिल्हाधिकारी राम लंके यांनी सांगितले.
अधिकारी यांच्या त्रासाला कंटाळून त्यांचा आत्महत्या करण्याचा मानस होता, असे रेकॉर्डिंगवरून दिसून येते, प्रमोद निंबोरकर, त्यांच्या पत्नी व त्यांचा मुलगा यांना न्याय मिळण्याकरीता कार्यमुक्त केलेल्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. संबंधित दोषींवर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी असे युवासेना तालुका प्रमुख आशिष निस्ताने यांनी सांगितले.
ऑडिओ क्लीपमध्ये काय ?
"सर माझी एक विनंती आहे. मला मुक्तता द्या मी आत्महत्या करत आहे.आज मी माझ्या परिवारातून निघून जात आहे.माझ्या मुलांचं दूध पाणी छेडलं आहे.तुमच्याकडे प्रस्ताव आल्या नंतर तुम्ही संधी दिली असती तर? पण तुम्ही ही तस केलं नाही", असं उप जिल्हाधिकारी राम लंके यांच्याशी फोनवर रडत रडत व्यथा सांगणाऱ्या तिवसा पंचायत समितीमधील रोजगार हमी योजना विभागात कंत्राटी असलेले तांत्रिक अधिकारी प्रमोद निंबोरकर यांच्या मृत्यूने खळबळ माजली आहे. मृत्यू पूर्वी प्रमोद निंबोरकर यांनी उपजिल्हाधिकारी राम लंके यांना फोन करून आपली व्यथा मांडली. आपल्याला तिवसा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सिंचन विहरीच्या प्रत्येक फाईल मागे पाच हजार रुपये गोळा करण्यास सांगत असल्याच देखील प्रमोद निंबोरकर यांनी आपल्या ऑडीओ क्लीप मध्ये सांगितलं आहे.