रत्नागिरी : खेड (Khed) येथील भरणे नाका येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. पत्नीची अब्रू वाचवताना अज्ञात व्यक्तीने केलेल्या हल्ल्यात जोगवा मागण्याचे काम करणाऱ्या पोतराजाला आपला जीव गमवावा लागला आहे. शनिवार २१ मे रोजी पहाटे २.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या पोतराजाचे नाव सुरेश कोले असून तो मूळ कर्नाटक येथील रहिवासी आहे.
याबाबती अधिकची माहिती अशी की, जोगवा मागून उदरनिर्वाह करण्यासाठी सुरेश कोले आणि त्यांची पत्नी रत्नागिरी जिल्ह्यात आले होते. हे जोडपे दापोली येथून फिरून शुक्रवारी रात्री खेडमधील भरणे नाका या ठिकाणी काळकाई मंदिरासमोरील प्रांगणामध्ये झोपले होते. याठिकाणी एका अज्ञात इसमाने येऊन सुरेश यांच्या पत्नीची छेडछाड करण्यास सुरुवात केली. यावेळी सुरेश यांना जाग आल्याने त्यांनी त्या व्यक्तीला तेथून हटकले. त्यानंतर थोड्या वेळाने तो इसम पुन्हा त्या ठिकाणी आला व त्याने सुरेश यांच्या पत्नीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. सुरेश यांनी त्याला प्रतिकार करत हटकण्याचा प्रतत्न केला. परंतु, त्या अज्ञात इसमाने रागाच्या भरात सुरेशच्या डोक्यात अवजड लाकडाने वार केला. यामध्ये सुरेश गंभीर जखमी झाले आणि जागेवरच बेशुद्ध पडले. त्यांच्यावर रत्नागिरी येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना रविवारी निधन झाले.
अज्ञात हल्लेखोरावर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०२ अन्वये खुनाचा गुन्हा तसेच सुरेशच्या पत्नीची छेडछाड प्रकरणी भादंवि कलम ३५४ अन्वये विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. या हल्लेखोराला पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग तसेच खेड पोलिसांनी चांगलीच कंबर कसली आहे. तपास कामासंदर्भात हल्लेखोराचा एक व्हिडीओ सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून हा व्यक्ती खेड मधील सुकिवली, वेरळ, खेड, भोस्ते, कळंबणी या गावातील अथवा परिसरातील असण्याची दाट शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या व्यक्तीची माहिती कोणाला असल्यास तात्काळ खेड पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.