तेजय बोरगरे | दापोली : येथील सध्या एका ऑडिओ क्लिपची (Audio Clip Viral) चर्चा आहे. दापोलीच्या राजकारणात ऑडिओ क्लिपचं सत्र सुरु आहे. मध्यंतरी दापोली नगरपंचायत निवडणुकीदरम्यान दापोलीच्या राजकारणात शिवसेना नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानं खळबळ निर्माण झाली होती. आणि आता पुन्हा एकदा दापोलीच्या राजकारणात खळबळ निर्माण झाली आहे. दापोली नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष खालिद रखांगे (Khalid Rakhange) यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.
एकीकडे दापोली नगरपंचायतीची आर्थिक स्थिती डबघाईला आली असताना अशी कोटीच्या कोटी उड्डाणे घेणारी लोकं दापोलीकरांची पिळवणूक करतायत का, हा प्रश्न आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय कदम यांच्याजवळ संपर्क साधला असता अधिक खुलासा खालिद भाईच करू शकतात. पण, हा एक मस्करीचा भाग असावा. त्यांनी ३ कोटी म्हंटले म्हणजे कोण ३ कोटी देणार आहे का? आम्ही सर्व खोके धारकांना एकत्र बसवून निर्णय घेऊ. विचारविनिमय करून मार्ग काढू, असं संजय कदम यांनी म्हंटले आहे.
यासंदर्भात आम्ही भाजपची बाजू समजून घेण्यासाठी भाजप कोकण संयोजक भटके विमुक्त आघाडी प्रमुख श्रीराम इदाते यांच्याजवळ संपर्क साधला. ते म्हणाले, या कारवाईमागे मोठं षडयंत्र असल्याचं सांगितलं. आम्ही पूर्णपणे खोकेधारकांच्या पाठीशी आहोत. जाणीवपूर्वक केलेली ही कारवाई आहे.
दापोलीमधील अनधिकृत बिल्डींगवर कारवाई होईल का, यासोबत जे जे दापोली नगरपंचायतीमध्ये बिल्डर लॉबीतून नगरसेवक गेले आहेत, या नगरसेवकांच्या बिल्डींगची पाहणी करण्याची मागणी केली आहे. यामुळे दापोली खोके धारकांचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला असून अनधिकृत खोके धारकांवर कारवाई होत आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये खोके धारकांवर होत असलेल्या कारवाई संदर्भात एका अनोळख्या व्यक्तीबरोबर दापोली नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष खालिद रखांगे संभाषण साधत आहेत. (आम्ही या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही.)
या कथित ऑडिओ क्लिपप्रकरणी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी दापोली नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष खालिद रखांगे यांना फोनवरुन संपर्क साधला. मात्र, त्यांनी या विषयावर मी काही बोलणार नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
यामध्ये दापोली शहरातील हातावर पोट असलेल्या गोरगरीब खोके धारकांवरती कारवाई करून व्यवसायिक गाळे काही कोटींना विकण्याचं षडयंत्र आहे का, असे अनेकानेक प्रश्न या ऑडिओ क्लीपमधून निर्माण झाले आहेत.
यासंदर्भात माजी आमदार सूर्यकांत दळवी यांना विचारले असता मी यासंदर्भात खालिद रखांगे यांच्याकडून सविस्तर माहिती घेतो, नेमकं प्रकरण काय आहे ते पाहतो आणि आपल्याला प्रतिक्रिया देतो, असं माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी म्हटलं. तर, दापोलीचे आमदार योगेश कदम यांना संपर्क केला. मात्र, त्यांनी प्रतिक्रिया दिली नाही.
दापोलीमधील बिल्डर लोकांना आपली पोटं भरण्यासाठी आणि कोट्यवधी रुपये मिळाले पाहिजेत यासाठी ही कारवाई करण्यात आली का, असा देखील प्रश्न निर्माण झाला आहे. खोके धारकांच्या कारवाईमध्ये अजून कोणत्या राजकीय लोकांचा हात आहेत. त्यासोबत दापोलीतील बिल्डर लॉबी यामध्ये सक्रिय आहे का आणि दापोलीतील प्रशासकीय लोकांना हाताशी धरून ही कारवाई सुरु आहे का, असा प्रश्न दापोलीकरांचा आहे. यामध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांचा कितपत हात आहे हा संशोधनाचा विषय आहे.
मात्र, एकंदरीत या ऑडिओ क्लिपमधील संभाषण पाहता दापोली नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष खालिद रखांगे यांचा आत्मविश्वास अधिकच दुणावल्याचा पाहायला मिळत आहे. त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सुप्रीम कोर्टाला आव्हान दिल्यासारखी भाषा यामध्ये केली आहे. 190 खोके आज उठवले असं ते या ऑडिओ क्लीपमधील व्यक्तीला सांगत आहेत. खोका एकही दापोलीत राहणार नाही, दापोलीत झिरो खोका होईल या कारवाईत स्टे सुप्रीम कोर्टाचा येऊ दे नाहीतर मोदींचा, दापोलीत एकही खोका दिसणार नाही. यासाठी मुंबई हायकोर्टाचा वकील 50 हजार रुपये घेऊन मागवला आहे. 3 करोड रुपये भाव आला पाहिजे दापोलीच्या दुकानांचा असं संभाषण या ऑडिओ क्लीपमध्ये पाहायला मिळत आहे.
दरम्यान, या सर्व कारवाईमध्ये अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. या सर्व कारवाईमागे कटकारस्थान आहे का, या सर्वाचा लाभ कोणाला मिळणार आहे. आणि यामध्ये कोणकोण सामील आहेत याची उत्तर मिळणं अपेक्षित आहेत. जर कारवाई होतेय तर दापोलीमधील अनधिकृत बिल्डींग, पार्किंग गाळे, दुकानं यांना कोणाचे अभय आहे. हा प्रश्न आहे. कोटीच्या कोटी उड्डाणे घेणाऱ्या लोकांमध्ये अजून किती जणांचा समावेश आहे हा प्रश्न सध्या दापोलीकरांमध्ये निर्माण झाला आहे.