संजय राठोड | यवतमाळ : राज्यात सर्वत्रच जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यवतमाळमध्येही मुसळधार पाऊस सुरु आहे. पाऊस सूर असताना स्मशानभूमीचे शेड पेटत्या मृतदेहावर पडले. अचानक शेड कोसळल्याने मृतदेहाची विटंबना झाली. त्यामुळे गावकऱ्यानी एकच संताप व्यक्त केला आहे.
यवतमाळमधील जमशेदपूर येथील रहिवासी मधुकर शामा आडे यांच्यावर अंत्यविधी सुरू असताना ही घटना घडली. मृतदेहास अग्नी दिल्यानंतर दहनशेडच्या बाहेर शेकडो गावकरी उपस्थित होते. त्यावेळी अचानक दहनशेडचा संपूर्ण स्लॅब मृतदेहावर पडला. यामुळे गावकऱ्यांनी संताप व्यकत केला असून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
दरम्यान, पुसद पंचायत समिती अंतर्गत निंबीनंतर जमशेदपुरची दहनशेड पडण्याची दुसरी घटना आहे. तीन वर्षापुर्वीचे बांधकाम पडल्याने बोगस बांधकाम ठेकेदारावर कारवाई होणार का ? याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.