कोरोनाची दुसरी लाट बऱ्यापैकी नियंत्रणात आली आहे. आतापर्यंत सुमारे चार लाख मुंबईकरांना कोरोनाची लागण झाली. यामध्ये काेराेनाला प्रतिबंध करणाऱ्या लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही कोरोना होणाऱ्या २६ रुग्णांचा समावेश आहे. तर पहिला डोस घेतलेल्या १० हजार ५०० नागरिकांना कोरोना झाल्याचे समोर आले आहे.
मार्च २०२० पासून मुंबईत कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. आतापर्यंत ७ लाख २० हजार लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी ९५ टक्के रुग्ण बरे झाले आहेत. कोविड १९ ला प्रतिबंध करणारी लस देण्यास १६ जानेवारीपासून सुरुवात करण्यात आली. त्याच दरम्यान कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार सुरू झाला.
या काळात बाधित रुग्णांची दररोजची संख्या थेट १० हजारांवर पोहोचली होती. मात्र अनेक उपाययोजनानंतर कोरोनाचा प्रसार आता मुंबईत नियंत्रणात आला आहे. मुंबईकरांनी कोरोनाला पूर्णपणे हद्दपार करण्यासाठी मास्कचा वापर करावा, सुरक्षित अंतर ठेवावे आणि वारंवार हात धुवावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. मुंबईत सध्या पालिका, सरकारी आणि खासगी रुग्णालये अशा ३९० ठिकाणी लसीकरण सुरू आहे. या ठिकाणी एका दिवसांत दीड लाखांहून जास्त लसीकरण करण्याची क्षमता आहे. २६ जून रोजी एकाच दिवसात मुंबईत सर्वाधिक १ लाख ५४ हजार २२८ इतके डोस देण्यात आले. त्यामुळे आगामी काळात जास्तीत जास्त लस मिळाल्यास लसीकरण वाढवण्यात येणार आहे.