अभिजीत हिरे | भिवंडी ग्रामीण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर राज्य शासनाच्या निधीतून रस्ते बांधणी सुरू असताना ठेकेदार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून तकलादू निकृष्ट दर्जाचे रस्ते बांधणी व दुरुस्ती चे काम करीत असल्याच्या तक्रारी वाढल्याने भिवंडी ग्रामीण विधानसभेचे आमदार शांताराम मोरे यांनी स्वतः प्रत्यक्ष काम सुरू असलेल्या ठिकाणी भेट देऊन निकृष्ट रस्ते कामाची पोलखोल केली आहे.
भिवंडी तालुक्यातील आमणे नांदकर रस्त्याचे काम सुरू असून त्यासाठी 1 कोटी 27 लाख 84 हजार रुपये खर्च केले जात असून सदर रस्त्याचे काम ठेकेदाराकडून निकृष्ट होत आल्याची तक्रार आल्यानंतर आमदार शांताराम मोरे यांनी स्वतः प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली असता डांबरीकरण केलेला पृष्ठभाग पायातील बुटाने सुध्दा उखडला जात असल्याचे आढळल्याने संतप्त आमदार शांताराम मोरे यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
या निकृष्ट कामाच्या ठिकाणी एक ही जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याने या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करून संबंधित ठेकेदाराचे बिल अदा करू नये अशी मागणी करणार असल्याचे सांगितले. तसेच यापुढे तालुक्यातील रस्त्याचे काम सुरू असलेल्या प्रत्येक ठिकाणी पाहणी करून निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांचे लाड करणार नसल्याचे आमदार शांताराम मोरे यांनी स्पष्ट केले आहे.