टीएमसीच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आहे कुठे यूपीए? असा सवाल करून सर्वांना धक्का दिला. ममतादीदींनी थेट यूपीएचं अस्तित्वचं नाकारलं. यानंतर आता महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी ममता बॅनर्जींच्या यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
काँग्रेस हाच पर्याय : नाना पटोले
भाजपच्या हुकुमशाही वृत्तीविरोधात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष सातत्याने लढत आहेत. देशातील जनता हे पहात आहे. वैयक्तिक महात्वाकांक्षेपेक्षा देश महत्त्वाचा असून भाजपाविरोधातील लढाई अंहकाराने नाही तर एकजुटीने लढण्याची आवश्यकता आहे, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.भाजपच्या या हुकुमशाही वृत्तीविरोधात काँग्रेस पक्ष सातत्याने लढत आहेत. राहुल गांधी हेच मोदी आणि भाजपाविरोधात ठामपणे उभे राहिले. असंही पटोले म्हणाले.
भाजपच्या दडपशाहीविरोधात काँग्रेसच लढतय– थोरात
भाजप आणि केंद्र सरकारच्या दडपशाहीविरोधात काँग्रेसच लढत आहे हे देशाला माहित आहे. आपल्या राजकीय फायद्यासाठी व वैयक्तिक महत्वाकांक्षेसाठी सोयीप्रमाणे भूमिका घेऊन कोणत्याही पक्षाला भाजपविरोधात लढता येणार नाही. काँग्रेस हाच देशासाठी आणि लोकशाहीसाठी सक्षम पर्याय आहे, असे काँग्रेस नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत.
देशातील गोरगरिब सर्वसामान्य जनतेचा आवाज बनून मोदी सरकारच्या विरोधात पहाडाप्रमाणे ठामपणे उभे राहून लढत राहिले. त्यामुळेच आज देशातील जनतेने त्यांची भूमिका स्वीकारलेली आहे. अशा वेळी राहुल गांधीवर अप्रत्यक्षपणे टीका करून भाजपला मदत होईल अशी भूमिका घेणारे पक्ष भाजपला पर्याय कसा ठरू शकतात?, असा सवाल थोरात यांनी केलाय.
भाजपच्या 'फोडा आणि झोडा'चा प्रयोगाला बळ देऊ नका – चव्हाण
लोकशाही व संविधानाप्रती कटिबद्धता आणि विद्यमान केंद्र सरकार विरोधातील संघर्षाबाबत काँग्रेसला आणि काँग्रेस नेतृत्वाला कोणाच्याही प्रशस्तीपत्राची आवश्यकता नाही. स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजपर्यंत नेहमीच काँग्रेसने सर्वसामान्यांसाठी प्रामाणिकतेने लढा दिला. भाजपच्या केंद्र सरकारचा लोकविरोधी भूसंपादन कायदा व तीन काळे कृषी कायदे रद्द करण्याबाबत आणि इतर अनेक प्रश्नांवर काँग्रेसची आक्रमक व सक्रिय भूमिका संपूर्ण देशाने पाहिली आहे.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या सक्षम, खंबीर नेतृत्वाखाली हा लढा भविष्यात अधिक नेटाने लढला जाईल. मागील 7 वर्ष केंद्र सरकार विरोधकांवर 'फोडा आणि झोडा'चा प्रयोग करते आहे. देशभरातील गैरभाजप पक्षांनी केंद्राच्या त्या प्रयोगाला बळ देणारे राजकारण करू नये, अशी अपेक्षा आहे. देशाच्या व्यापक हिताला ते पोषक नाही, असा सल्ला सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिलाय.