लोकशाही न्यूज नेटवर्क
शेतकऱ्यांच्या अन्यायाविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे कायम राहतात. पण तब्येतीचा विचार करता त्यांनी उपोषण करू नये, असे आम्हाला वाटते, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. तर, दुसरीकडे केंद्रातील मोदी सरकार शेतकऱ्यांबाबत बेफिकीर असल्याचे दिसते, अशी टीका थोरात यांनी केली.
बाळासाहेब थोरात यांनी पुण्यात एका कार्यक्रमादरम्यान प्रसार माध्यमांशी संवाद साधला. शेतकऱ्यांवर अन्याय होत असताना अण्णा हजारे शांत राहतील, असे वाटत नाही. मात्र, वयाचा विचार करता त्यांच्या तब्बेतीची काळजी वाटते. मात्र भाजपाने केवळ सत्तेच्या काळजीपोटी अण्णांना उपोषणाला न बसण्याची विनंती केली असल्याची टीकाही त्यांनी केली.
दिल्लीत सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन हे भारताच्या इतिहासातील एक ऐतिहासिक आंदोलन आहे. थंडीवाऱ्यात शेतकरी गेल्या दोन महिन्यांपासून आंदोलन करीत आहेत. पण केंद्र सरकारकडून हे आंदोलन चिरडून टाकण्याचे घृणास्पद काम हे सरकार करत आहे. देशाचा प्रमुख देखील त्यांच्याशी बोलतही नाही, तर, केंद्रीय गृहमंत्री इतर राज्याच्या निवडणुकासाठी दौरे करीत आहे, हे अत्यंत दुर्दैवी आहे, असे थोरात म्हणाले.
भाजपाची सत्तेच्या गप्पा कशासाठी?
माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात लवकरच भाजपाची सत्ता येईल, असे म्हटले आहे. याबाबत बाळासाहेब थोरात यांनी देवेंद्र फडणवीस आणि इतर भाजपा नेत्यांची खिल्ली उडवली. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जेव्हा असं म्हणतात, तेव्हा समजून जायचे की, त्यांच्या नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. घरवापसीच्या निमित्ताने कोणी राष्ट्रवादी, कोणी काँग्रेस तर कोणी शिवसेनेत जाण्यास निघालेले आहेत. त्यांना रोखण्यासाठी भाजपाचे नेतेमंडळी असे बोलत असतात", असे बाळासाहेब थोरात म्हणाले.