कोरोनाचा प्रादुर्भाव मंदावल्याने राज्यातील शाळांपाठोपाठ महाविद्यालये आणि विद्यापीठे पुन्हा सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. महाविद्यालये आणि विद्यापीठात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.
आजपासून राज्यभरातील कॉलेज सुरु होत आहेत. मात्र अनेक कॉलेजेसच्या एसओपी जाहीर होत नसल्यानं विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचं वातावरण होतं. मात्र आज औरंगाबाद आणि पुणे विद्यापीठानं संबंधित महाविद्यालयांच्या प्रशासनाला आदेश जारी केले आहेत. याशिवाय राज्यातील सर्व कृषी विद्यापीठे आणि त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालये आजपासून सुरू होणार आहे.
20 ऑक्टोबरपासून कॉलेज सुरु करण्याबाबत राज्य सरकारनं हिरवा कंदील दिला आहे. मात्र पुणे, औरंगाबाद विद्यापीठ, आणि कृषी विद्यापीठाकडून कालपर्यंत त्यासंदर्भातले आदेश महाविद्यालयांना मिळाले नव्हते. मात्र आज आदेश जारी केल्यानं विद्यार्थ्यांचा संभ्रम दूर झाला आहे.
काय आहेत नियम?
-50 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेनं महाविद्यालयं सुरु करण्याबाबत स्थानिक स्तरावर निर्णय घ्यावा.
-स्थानिक प्राधिकरणांशी विचारविनिमय करुन वर्ग सुरु करावेत.
-18 वर्षावरील कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच प्रत्यक्ष उपस्थित राहण्यास परवानगी
-प्रत्यक्ष उपस्थित न राहता येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करावी.
-लसीकरण न झालेल्या विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी महाविद्यालयानं विशेष मोहिम राबवावी.
-शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचंही लसीकरण प्राधान्यानं करावे.
-निर्जंतुकीकरण करणे, सुरक्षित अंतर, मास्क नियमांचे काटेकोर पालन करावे.
-वसतीगृहे टप्प्याटप्प्याने सुरु करण्याबाबत संचालक, उच्च शिक्षण आणि तंत्र शिक्षण विभागाकडून आढावा घेऊन निर्णय घ्यावा.