सचिन बडे | औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची बुधवारी औरंगाबाद येथे जाहिर सभा होणार आहे. याआधी शिवसेनेने (Shivsena) उद्धव ठाकरेंच्या चार सभेचे टीझर रिलीज केले असून सभेची जय्यत तयारीही केली आहे. यामुळे पूर्ण औरंगाबाद शहर शिवसेनामय झाले आहे. परंतु, उद्धव ठाकरेंच्या या सभेवर कोरोनाचे संकट घोंगावत आहे.
देशात आणि राज्यातही कोरोना पुन्हा डोके वर काढत आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होते आहे. अशातच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची सभा सुपर स्प्रेडर ठरू शकते. या सभेत राज्यातील विविध भागतून नागरिक सहबागी होण्याची शक्यता असून 30 ते 50 हजार नागरिक उपस्थित राहण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मुख्यमंत्र्यांची सभा आणि गर्दी पाहता कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेनंतर मास्कसक्ती होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सभेच्या तोंडावर औरंगाबादेत कोरोनाचा पुन्हा शिरकाव झाला असून 5 जून रोजी कोरोनाचे दोन रुग्ण तर 6 जून रोजी 7 जण आढळले. कोरोनाच्या चौथ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्य आरोग्य विभागाने सतर्कतेचा इशारा देत मनपा प्रशासनाला तपासण्या वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत. यानुसार आजपासून औरंगाबाद शहरात कोरोना तपासणीला पुन्हा सुरुवात होत आहे. अशातच राज्यात एकीकडे नियमावली लागू करत असताना औरंगाबादमध्ये मात्र सत्ताधारी शिवसेना पक्षाची भव्य विराट सभेचे आयोजन करत आहेत. ही सभा औरंगाबाद महापालिकेची डोकेदुखी ठरु शकते.