चंद्रशेखर भांगे | पुणे : राज्यातील बड्या नेत्यांचे फोन टॅप प्रकरणी सीआरपीएफच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुणे पोलिसांकडून न्यायालयामध्ये क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला आहे. या वृत्तास वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.
फोन टॅपिंग केल्याप्रकरणी पुण्याच्या तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्यावर फेब्रुवारी महिन्यात पुण्यातील बंड गार्डन पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार बच्चू कडू, माजी खासदार संजय काकडे आणि आमदार आशिष देशमुख यांचे फोन टॅपिंग केल्याचा आरोप होता.
2015 ते ते 19 या कालावधीमध्ये रश्मी शुक्ला यांनी राज्यातील अनेक नेत्यांची फोन टॅपिंग केल्याचा ठपका शुक्ला यांच्यावर ठेवत गुन्हा दाखल करण्यात आला होता. यासह राज्यातील नेत्यांचे टॅप करून त्या फोनमधील संभाषण भाजप सेना सरकारमधील वरिष्ठ नेत्यांना पुरविल्याचा आरोपही शुक्ला यांच्यावर करण्यात आला होता. विधी मंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उच्चस्तरीय समितीने अहवाल सादर केला होता. त्यानंतर शुक्ला यांच्या विरोधात राज्य शासनाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.
दरम्यान, आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला या सध्या हैदराबादमध्ये कार्यरत आहेत. काहीच दिवसांपुर्वी त्या देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचल्या होत्या. तर, दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रश्मी शुक्ला यांची भेट झाल्याची माहिती मिळाली होती. यामुळे आता अनेक चर्चा रंगताना दिसत आहेत.