सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाच्या उद्घाटनापुर्वीचं श्रेयवादाची लढाई सूरू झाली आहे. केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी चिपीचं श्रेय आपलं असल्याचं सांगून एकचं खळबळ उडवून दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी आमचं काही वैर नाही. त्यांनी पाहुण्यांसारखं यावं. हवं तर म्हावऱ्याचा पाहुणाचारही करू. जाताना मात्र जिल्ह्याला काही तरी देऊन जावं, असं नारायण राणे यांनी सांगितलं.
सिंधुदुर्गात उद्या चिपी विमानतळाचं लोकार्पण होणार आहे. त्यापूर्वीच चिपी विमानतळाच्या उद्घाटनापुर्वीचं श्रेयवादाची लढाई सूरू झाली आहे. नारायण राणे यांनी भाजपच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेत चिपी विमानतळाबाबत व आपल्या कामाचा लेखाजोखा मांडला.
चिपी विमानतळाचे सर्व श्रेय भाजप आणि आमचं आहे. त्यात कुणाचंही श्रेय नाही. पाहुणे म्हणून आम्ही बोलावलंय पाहुणे म्हणून या. पदाप्रमाणे काही तरी द्या आणि जा. नाही तर पूर्वी मोठमोठी माणसं कार्यक्रमाला यायची, एक मंत्री आला की मोठमोठे रस्ते व्हायचे. आता एकदोन तीन रस्त्यांचे पैसे तरी द्या. विकासाच्या अनेक गोष्टी आहेत. त्याला पैसे द्या. वादळाच्यावेळी जाहीर केलेले पैसे द्या. पूरपरिस्थितीत जाहीर केलेले पैसे द्या, असं राणे यांनी म्हणत एकप्रकारे शिवसेनेला डीवचलं.
सरकारची संकुचित मनोवृत्ती
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आलेलं नाही. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ही सरकारची संकुचित मनोवृत्ती आहे. हा सरकारी कार्यक्रम आहे. हा काही देसाईंच्या घरचा कार्यक्रम नाही. त्यांच्या मुलाचं लग्न नाही. देवेंद्र सहनशील नेते आहेत. मी त्यांच्या जागी असतो तर चित्रं वेगळं असतं, असं राणे म्हणाले. तसेच मी देवेंद्र फडणवीसांशी या विषयावर चर्चा केली. तेव्हा फडणवीसांनी जनतेच्या हिताचा कार्यक्रम आहे. आंदोलन निदर्शने करू नका, असं सांगितलं. मात्र त्यांना निमंत्रण न देणं, त्यांचं निमंत्रण पत्रिकेत नाव नसणं ही संकुचित मनोवृत्ती आहे, असंही ते म्हणाले.