मयुरेश जाधव । कोकणात झालेल्या अतिवृष्टी, पूर आणि दरडी कोसळण्याच्या घटनांनंतर कोकणाला सध्या मोठ्या प्रमाणात मदतीची गरज आहे. अशातच उद्या २७ जूलै रोजी असलेला मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस साजरा न करण्याचं आवाहन स्वतः मुख्यमंत्र्यांनीच केलं असून त्यामुळे हा वाढदिवस आता मदतकऱ्याने साजरा करण्याचा निर्णय अंबरनाथच्या शिवसेना शहर शाखेनं घेतलाय.
कोकणातल्या महाड, चिपळूण, खेड या परिसरात पुरामुळे अक्षरशः हाहा:कार मजला असून दरडी कोसळण्याच्या घटनांमध्ये अनेकांना जीव गमवावा लागलाय. या पार्श्वभूमीवर कोकणाला मदत करण्याचं आवाहन सर्वच स्तरातून केलं जातंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा २७ जुलै रोजी असलेला वाढदिवस साजरा न करण्याचं आवाहन स्वतः उद्धव ठाकरे यांनीच केलं असून त्यामुळे आता हा वाढदिवस मदतकार्याने साजरा करण्याचा निर्णय अंबरनाथच्या शिवसेना शहर शाखेनं घेतलाय. यासाठी आज शहर शाखेत शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.
शिवसेनेचे विभागप्रमुख अरविंद मालुसरे हे अंबरनाथच्या शिवसेना शहर शाखेच्या वतीने पूरग्रस्त भागातल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी महाडला पोहोचले देखील आहेत. त्यांच्याकडून तिथल्या परिस्थितीची माहिती घेऊन त्यानुसार आता मदत गोळा करण्याचं आवाहन करण्यात आलंय. शहरातील कारखानदार, व्यापारी, उद्योजक, राजकारणी यांच्याप्रमाणेच सर्वसामान्यांनाही कोकणात काही मदत पोहोचवायची असल्यास ती शिवसेना शहर शाखेत जमा करण्याचं आवाहन करण्यात आलंय. यानंतर २८ जुलै रोजी ही मदत घेऊन अंबरनाथचे शिवसैनिक महाड आणि चिपळूणला रवाना होणार असल्याची माहिती अंबरनाथचे शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी दिली आहे.