औरंगाबाद : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची (Uddhav Thackeray) आज औरंगाबाद (Aurangabad) येथे स्वाभिमानी सभा होणार आहे. यासाठी शिवसेनेकडून (Shivsena) जंगी तयारी करण्यात आली असून तगडा पोलीस बंदोबस्त असणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्री सभेत काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे सात ते साडेसात दरम्यान मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदानावर पोहोचणार असून सभेनंतर मुख्यमंत्री थेट विमानाने मुंबईकडे रवाना होणार आहे. असे असले तरी तीन वाजताच नागरिकांची गर्दी जमण्यास सुरुवात होईल. सभेसाठी मैदानावर 20 ते 30 हजार खुर्च्या लावल्या आहेत. तर 100 फूट व्यासपीठावर मंत्री व नेत्यांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मुख्यमंत्री साडेसात वाजता मैदानावर पोहोचतील व 25 ते 30 मिनिटे भाषण करतील.
खासदार संजय राऊत, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री सुभाष देसाई, विधान परिषद उपसभापती नीलम गोर्हे, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांसह मराठवाड्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित असणार आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आला आहे. तब्बल 109 निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक, ओपन निरीक्षकांसह 1385 पोलीस कर्मचारी सभेसाठी तैनात असणार आहेत. तर सर्व पोलीस कर्मचाऱ्यांची बुधवारची सुट्टी रद्द केली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या सभेआधी औरंगाबादकरांसाठी राज्य सरकारने मोठ्या घोषणा केल्या आहेत. औरंगाबाद शहरातील 224 रस्त्यांसाठी 207 कोटी रुपये मंजूर केले. तर 50 टक्के पाणीपट्टी माफीला अखेर मनपाचीही मंजुरी दिली आहे.