वाशिम जिल्ह्यात कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नशील असणारे रिसोड तालुक्यातील गोवर्धन गाव कोरोनामुक्त करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गोवर्धनचे सरपंच गजानन वानखेडे यांच्याशी दुरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. तसेच गावामध्ये राबविलेल्या उपाययोजनांची माहिती जाणून घेतली व गाव कोरोनामुक्त केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफ, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, पद्मश्री पोपटराव पवार मुख्य सचिव सीताराम कुंटे, ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, सचिव आबासाहेब ज-हाड यांच्यासह राज्य टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. तसेच वाशिम येथून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, पंचायत विभागातील गट विकास अधिकारी एस. जी. कांबळे, तामसीच्या सरपंच ज्योती कव्हर, गोवर्धनचे ग्रामसेवक पी. बी. भालेराव, तामसीचे ग्रामसेवक श्याम बरेटीया आदी उपस्थित होते.