मुंबई : बांधकाम मंत्री शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 22 आमदार सध्या नॉट रिचेबल असल्याने राज्यात राजकीय खळबळ माजली आहे. अशातच शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी मोठे वक्तव्य केले आहे. एकनाथ शिंदे आणि शिवसेना आमदारांच्या नाराजीची एक दिवस आधीच माहिती मिळाली होती, असा दावा त्यांना केला आहे.
चंद्रकांत खैरे म्हणाले की, मला काल विधानभवनात कुणकुण लागली होती. माझी नजर त्यांच्यावर होती. आमदारांची हालचाल मी पाहत होतो. विनायक राऊत यांना लागलेल्या कुणकुणीची माहिती दिली होती आणि पुन्हा काल रात्रीही माहिती दिली होती, असे त्यांनी सांगितले आहे. तसेच, कार्यकर्ते संतप्त होत चालले असून ते काहीही करू शकतात, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात मतभेद असल्याची उघडपणे चर्चा अनेक दिवसांपासून होती. परंतु, शिवसेनेकडून ती फेटाळण्यात येत होती. अखेर विधान परिषद निवडणुकीपासून एकनाथ शिंदे यांच्यासह 22 आमदार नॉट रिचेबल येत आहेत. यामुळे एकनाथ शिंदे भाजपमध्ये जाणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामुळे ठाकरे सरकार धोक्यात आले आहे.