मुंबई आणि उपनगराला कालपासून पावसाने झोडपून काढल्याने संपूर्ण शहरात मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा खोळंबा झाला होता. रात्रभर मुसळधार पाऊस चालल्याने रेल्वे वाहतूक ठप्प झाली. काही ठिकाणी कमरेइतकं पाणी साचलं होतं. तर अनेक ठिकाणी घरांमध्येही पाणी शिरलं. यानंतर लोकल पूर्ववत करण्याचं काम सुरू होतं. अखेर मध्य रेल्वे सेवा सुरळीत झाल्याची माहिती रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे.
सकाळपासून पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर आधी पश्चिम, नंतर मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल सेवा पुन्हा सुरू झाली आहे. मध्य रेल्वेनं याबद्दलची माहिती दिली आहे.
मुंबईत अतिवृष्टी झाल्यानं प्रचंड हाहाकार उडाला आहे. मुंबईत काही भागांत दुर्घटनाही घडल्या असून, मुंबईच्या वाहतुकीलाही फटका बसला आहे. मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल वाहतुकीवरही पावसाचा परिणाम झाला. रात्रभर झालेल्या पावसाने मुंबईतील अनेक रस्त्यांबरोबरच रेल्वे रुळ पाण्याखाली गेले. तर सायन्ससह अनेक रेल्वे स्थानकांवरही प्रचंड पाणी साचलं होतं. त्यामुळे सकाळी ६ वाजेपासूनच लोकल वाहतूक विस्कळीत झाली होती. आता पावसाचा जोर ओसरल्याने रेल्वे सेवा पूर्ववत झाली आहे.