मयुरेश जाधव | सोशल मिडियावर गेल्या काही दिवसांपासून एका वृद्ध आजीला मारहाण केल्याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओतील अमानुष मारहाणीनंतर एकच संतापाची लाट उसळली आहे. त्यानंतर वृद्ध आजीला मारहाण करणाऱ्या गजानन बुवा चिकणकर यांच्यावर पोलिसांनी सु मोटोने गुन्हा दाखल केला आहे.
आठवड्याभरापूर्वीचा हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून वृद्ध पत्नीला अमानुषपणे होणारी मारहाण पाहून संताप व्यक्त केला जात आहे. कल्याण मलंगगड जवळील द्वारली गावातील हद्दीत हा प्रकार घडला आहे. गजानन बुवा चिकणकर असं माहाण कऱणाऱ्या या वृद्धांचं नाव आहे. महिलेच्या नातवाने हा व्हिडीओ रेकॉर्ड करत आजोबांकडून होणारी अमानुष मारहाण कॅमेऱ्यात कैद केली आहे. ३१ मे रोजी ही घटना घडली असून व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर समोर आली आहे.
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी घटनेची दखल घेत घटनास्थळ गाठलं होतं. यावेळी गजानन बुवा चिकणकर वारीसाठी आळंदीला गेले असल्याचं कुटुंबाने सांगितलं. दरम्यान याप्रकरणी त्यांच्या पत्नीने पोलिसांत कोणतीही तक्रार दिलेली नाही. पोलिसांना कुटुंबाला समज दिली असून गजानन बुवा चिकणघर यांनाही समज दिली जाणार आहे.
व्हायरल व्हिडीओत काय ?
व्हिडीओत दिसत असल्याप्रमाणे पाण्याच्या वादातून ते आपल्या पत्नीला जाब विचारत असून यावेळी बादलीने तसंच लाथाबुक्क्यांनी मारहाण करत असल्याचं दिसत आहे. महिला वारंवार मला मारु नका अशी विनंती करत असतानाही ते मात्र अमानुषपणे मारहाण करताना दिसत आहेत. यावेळी घऱात इतर महिलाही काम करताना दिसत असून कोणीही मध्यस्थी करत मदतीसाठी येताना दिसत नाही.