केंद्राकडून यूजीसी नेट परीक्षा रद्द करण्यात आली आहे. युजीसी नेट परीक्षेत पेपर लीक झाल्याच्या शक्यतेने केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने परीक्षाच रद्द केली आहे. आता नव्याने परीक्षा घेतली जाणार आहे. यावर आता अनेक प्रतिक्रिया येत आहे.
याच पार्श्वभूमीवर आता जयंत पाटील यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. जयंत पाटील म्हणाले की, युजीसी नेट परीक्षेत पेपर लीक झाल्याच्या शक्यतेने केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने १९ जून रोजी झालेली नेटची परीक्षाच रद्द केली आहे. गुप्तचर अहवालात या परीक्षेच्या आयोजनात अनियमितता असल्याचे नमूद करण्यात आले आहे. नुकताच नीट परीक्षेत झालेला भोंगळ कारभार ताजा असताना हा प्रकार म्हणजे सरकारच्या अकार्यक्षमतेचा आणखी एक नमूनचा आहे.
यासोबतच ते म्हणाले की, वर्षभर अतिशय प्रामाणिकपणे अभ्यास करून विद्यार्थी परीक्षा देत असतात, या परीक्षाच ग्राह्य धरल्या जात नसतील तर विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरण्याचे काम सरकार करत आहे. सातत्याने होत असलेल्या पेपरफुटीच्या प्रकरणांमुळे शिक्षण विभागाची विश्वासार्हता धुळीस मिळाली आहे. देशाच्या भविष्याला जे योग्य न्याय देऊ शकत नाहीत ते देशाचे भविष्य काय घडवणार असा प्रश्न निर्माण होतो. असे जयंत पाटील म्हणाले.