राज्यात तीन महिन्यांपूर्वी अभूतपूर्व राजकीय गोंधळ घडला आणि राज्यात नवे शिंदे- फडणवीस सरकार अस्तित्वात आले. त्यानंतर अनेक टीका झाल्यानंतर सत्तास्थापन झाल्यानंतर मंत्रीमंडळ विस्तार पार पडला. या मंत्रिमंडळ विस्तारावर देखील विरोधकांकडून टीका झाली. आता या सरकारचा दुसरा मंत्रीमंडळ विस्तार पार पडणार आहे. हा दुसरा मंत्रीमंडळ विस्तार लवकरच पार पडेल अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
राज्याच्या मंत्रिमंडळात आतापर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय १८ कॅबिनेट मंत्र्यांचाच समावेश आहे. यामध्ये शिंदे गटाचे नऊ, तर भारतीय जनता पक्षाचे नऊ मंत्री आहेत. त्यामुळे कॅबिनेट मंत्र्यांच्या जोडीला आता राज्यमंत्रीही नव्या विस्तारात असतील, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच करण्यात येणार आहे. सध्या केवळ कॅबिनेट मंत्रीच आहेत, त्यामुळे अनेकांवर इतर विभागाचा पदभार आहे. राज्यमंत्री नसल्याने अनेक मंत्र्यांकडे अतिरिक्त मंत्रालयाचा पदभार आहे, तो कमी करण्यासाठी येत्या मंत्रिमंडळ विस्तारात राज्यमंत्रीपदाचा शपथविधी होणार आहे. या नव्या विस्तारात कोणाला किती मंत्रिपदे मिळतात, हे पाहणे औत्सुक्याचे आहे. सोबतच शिंदे गटातील अनेक मंत्री नाराज असल्याची चर्चा होती. बच्चू कडू आणि संजय शिरसाट यांनी मंत्रिपदाबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे या विस्तारात यांची नाराजी होईल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.