भूपेश बारंगे | वर्ध्यात आर्वी शहराला जोडणाऱ्या प्रमुख राष्ट्रीय महामार्गाचे काम अद्याप पूर्णत्वास न आल्याने व रस्त्यात खड्डेजन्य परिस्थिती निर्माण झाली. यामुळे अनेक अपघाताच्या घटना वाढत आहेत. या समस्येवर आक्रमक होत आज प्रहारच्या वतीने बाळा जगताप यांच्या नेतृत्वात "दफन आंदोलन" करण्यात आले. या आंदोलनानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. तसेच येत्या काही दिवसात तिन्ही रस्ते वाहतुकी योग्य रस्ता करून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
आर्वी शहराला जोडणाऱ्या प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आर्वी – तळेगाव, आर्वी – कौडण्यपूर, आर्वी – वर्धा या रस्त्यांचे बांधकाम सुरू आहे. मात्र अजून पर्यंत पूर्णत्वास गेले नसल्याने रस्त्यावर अर्धवट कामे केल्याने अनेक ठिकाणी रस्त्यामध्ये खड्डे पडले आहे, तर नदीवरील पुलाचे कामे अर्धवट आहे. गेल्या तीन वर्षापासून ठेकेदार कंपनीकडून तीनही रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत. मात्र त्या रस्त्याचे काम अजूनपर्यंत चालू केले नाही. परिणामी अनेक वाहन चालकांना अपघाताने गंभीर दुखापत, अपंगत्व आले आहेत. पावसाळ्याचे दिवस चालू असल्याने या तिन्ही रस्त्यावर सिमेटीकरण किंवा डांबरीकरण नसल्याने पूर्ण रस्ते चिखलमय झाले आहे. त्यात रस्त्यावर मोठमोठे खड्डे खोदून ठेवल्यामुळे पावसाच्या पाण्याने खड्डे पूर्णतः भरून जातात त्यामुळे मोठ्या अपघाताची शक्यता आहे.
प्रशासनाला जागे करण्यासाठी आज आर्वी देऊरवाडा रस्त्यावर प्रहारच्या वतीने बाळा जगताप यांच्या नेतृत्वात "दफन आंदोलन" करण्यात आले. बाळा जगताप व देवा भलावी यांनी स्वतःला पूर्णतः जमिनीत गाडून घेतले होते त्यांचे फक्त हात हेच उघडे होते.आंदोलन सुरू असताना कार्यकर्त्यांची व बघणाऱ्यांची मोठी गर्दी होती. त्यामुळं सदर रस्त्यावर एक तास वाहतूक ठप्प झाली होती.अचानक पणे बाळा जगताप यांनी घेतलेल्या या अफलातून आंदोलनात्मक पवित्र्यामुळे प्रशासन पूर्णपणे हादरले होते. त्यामुळे आंदोलन स्थळी भेटण्याकरिता सर्वप्रथम आर्विचे तहसीलदार चव्हाण आले असता आंदोलनाची भीषणता बघता प्रशासनाची तारांबळ उडाली. त्यानंतर आंदोलन स्थळी राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता वैभवी वैद्य या उपस्थित झाल्या, सहाय्यक पोलिस निरीक्षक सोनुले, उपनिरीक्षक ठावरे यांच्या उपस्थितीत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता.
आंदोलन स्थळी भेट दिल्यानंतर कार्यकारी अभियंता (NH) यांनी आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली असता बाळा जगताप यांनी लेखी आश्वासनाशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा ठाम निर्धार केला. अखेर आधिकारी वर्गाने सकारात्मक चर्चा करून येत्या काही दिवसात तिन्ही रस्ते वाहतुकी योग्य रस्ता करून देऊन बाकी कामे लवकरात लवकर पूर्णतः लावू असे आश्वासन दिले. आश्वासनाअंती आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.दिलेल्या वेळेत जर रस्त्यांचे काम पूर्ण झाले नाही तर यापेक्षाही मोठे आंदोलन अमरावती येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात करण्यात येईल त्यानंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीला सर्वस्वी आपण जबाबदार असाल असा इशारा येवेली बाळा जगताप यांनी दिला.