विधानसभा निवडणुकीसाठी आता भाजपने मुंबईत भाकरी फिरवण्याचं ठरवलं आहे. सुमार कामगिरी असलेल्या काही आमदारांना डच्चू देताना काही ठिकाणी जुन्या व जेष्ठ नेत्यांचं पुनर्वसन करण्याच्या चर्चेने ही जोर धरला आहे.
लोकसभा निवडणुकांचा निकालातून धडा घेतलेली भाजप आता कोणतीही रिस्क घेण्याच्या भूमिकेत दिसत नाही. किंबहूना आता भाजप ताकही फुंकून पिताना दिसतेय. त्याचाच एक भाग म्हणून भाजपकडून आता सुमार कामगिरीच्या विद्यमान आमदारांचा पत्ता कट करण्याची भूमिका घेतलीये. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक काल रात्री संपन्न झाली. या बैठकीत सर्व आमदारांच्या कामगिरीवर सविस्तर चर्चा झाली. तसेच शुक्रवारी महाराष्ट्र विधानसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे पहिल्या यादीत कोणाची वर्णी लागणार? आणि कुणाला पक्ष घरचा रस्ता दाखवणार? याची उत्सुक्ता वाढलीय.
याआधीही लोकसभा निवडणुकीत सुमार कामगिरी असलेल्या आमदारांमध्ये भारती लव्हेकर, राम कदम, तमिल सेल्व्हन, अमित साटम या आमदारांना भाजपने शेवटची संधी दिली होती. परिणामी लोकसभा निवडणुकीनंतर ही खराब परफॉर्मन्स असलेल्या आमदारांच्या जागी आता गोपाळ शेट्टी, प्रकाश मेहता अशा निष्ठावंत व जुन्या नेत्यांना पुन्हा संधी देण्याचा विचार पक्ष नेतृत्वाने केल्याची माहिती एका वरिष्ठ नेत्याने दिली आहे. एकूणच काय; मुंबईत कुणाची भाकरी भाजली जाणार? आणि कुणाची करपणार? हे येत्या आठवड्याभरात जाहीर होणाऱ्या उमेदवारांच्या यादीत स्पष्ट होणार आहे.