भाजप आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) यांच्यावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी नवी मुंबईतील सीबीडी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजपा नेते गणेश नाईक (Ganesh Naik) यांच्या विरोधात नवी मुंबईतील एका पिडित महिलेने केलेल्या तक्रारीची दखल राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी घेत योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत.
महिलेचे आरोप काय आहेत ?
गणेश नाईक यांच्यावर आरोप करणारे महिला नेरूळ परिसरात राहणारी आहे. गणेश नाईक आणि ती महिला 1993 पासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात असल्याचा आरोप त्या महिलेने केला आहे. तसा अर्जच नेरूळ पोलीस ठाण्यात दिला आहे. आठवड्यातून दोन ते तीन दिवस गणेश नाईक त्या महिलेसोबत राहत असत. त्यावेळी अनेकदा शरीरसंबंध झाल्याने गणेश नाईक यांच्यापासून तिला एक पंधरा वर्षाचा मुलगा असल्याचे देखील तिने आरोपात म्हटले आहे. आघाडी सरकार असताना गणेश नाईक राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री होते तेव्हा संबंधित महिलेला गणेश नाईक यांच्यापासून दिवस गेले व महिलेला त्यांच्यापासून मुलगा झाला असल्याचेही त्या महिलेने तक्रार अर्जात म्हटले आहे.
गणेश नाईक यांच्यापासूनच्या महिलेला झालेला मुलगा आता पंधरा वर्षाचा झाला असून मुलाच्या शिक्षणाच्या व भविष्यासाठी तरतूद म्हणून उपाययोजना करा असा तगादा महिलेने गणेश नाईक यांच्याकडे केल लावला, मात्र आज करू उद्या करू असे सांगत नाईक यांनी टाळाटाळ केल्याचा आरोपही त्या महिलेने केला आहे. शिवाय जेव्हा जेव्हा विषय काढला जातो तेव्हा तेव्हा त्या महिलेला व मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली जात असल्याचाही आरोप संबंधित महिलेने केला आहे.