चाळीसगावचे भाजपा आमदार मंगेश चव्हाण यांनी स्टिंग ऑपरेशन करुन पोलिसांकडून कन्नड घाटात केल्या जाणाऱ्या बेकायदेशीर वसुलीबद्दल धक्कादायक खुलासा केला. या घाटामधून जाणाऱ्या प्रत्येक अवजड वाहनाकडून पोलीस बेकयादेशीरपणे पैसे घेत असल्याचे व्हिडीओ चव्हाण यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन पोस्ट केलेत. विशेष म्हणजे आमदार चव्हाण यांनी स्वत: ट्रक चालक म्हणून या घाटातील नाकाबंदीमधून जाताना कशाप्रकारे लाच द्यावी लागते हे दाखवण्यात आलं आहे. हे व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून भाजपा समर्थकांनी आमदार चव्हाणांनी केलेल्या या स्टिंग ऑपरेशनवरुन त्यांचं कौतुक केलं आहे.
यासंदर्भातील व्हिडीओ चव्हाण यांनी शूट केले असून ते सविस्तर माहितीसहीत फेसबुकवर पोस्ट केलेत. "दुरुस्तीसाठी अवजड वाहनांना प्रवेश बंद असलेल्या कन्नड घाटात पोलिसांकडून ५०० ते १००० रुपये प्रति अवजड वाहन घेऊन त्यांना सोडण्यात येते, यामुळे अनेकदा घाट जाम होऊन ५ ते १० तास घाट जाम होतो. गंभीर रुग्ण घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिका तासंतास अडकून पडतात, यामुळे पूर्ण राज्यात चाळीसगाव तालुक्याचे नाव खराब होत आहे," असं चव्हाण यांनी म्हटलं आहे.