मालाडच्या दानापाणीतील हजारो वृक्षांवर चाललेली कुऱ्हाड बघता पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंचे पर्यावरण प्रेम म्हणजे ढोंगबाजी असल्याची टीका भाजपाने केली आहे. मालाडच्या दानापाणी भागात मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लोकशाही न्यूजनेच या घटनेला वाचा फोडली होती.
मेट्रो कारशेडसाठी आरेमधील वृक्षतोडीला पर्यावरणप्रेमींबरोबर शिवसेनेने तीव्र विरोध केला होता. त्यातही आदित्य ठाकरे आघाडीवर होते. तर आता दानापाणीत वृक्षतोड करून मोठ्या प्रमाणात भराव टाकण्यात आला आहे. या जागेवर एमटीडीसीचा बोर्डही आहे. मुंबई उपनगरचे पालकमंत्री असलेल्या आदित्य ठाकरे यांच्याकडे पर्यावरण आणि पर्यटन ही दोन्ही खाती आहेत, हे उल्लेखनीय!
त्यावरून भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. भाजपाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी याबाबत तक्रार दिलेली आहे. मुंबईच्या विकासाच्या आड येण्यासाठी त्यांनी पर्यावरणाचा वापर केला आहे. त्यांना या सर्वांची उत्तरे न्यायालयात द्यावी लागतील, असे भातखळकर म्हणाले.