सुरेश काटे | कल्याण डोंबिवली महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती आणि माजी भाजप नगरसेवक संदीप गायकर यांना पोलिसांनी अटक केली आहे. एका महिला विनयभंग प्रकरणात संदीप गायकर फरार होते. कल्याण न्यायालयात संदीपला हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
कल्याण मधील एका महिलेने बाजारपेठ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, केडीएमसी माजी स्थायी सभापती आणि भाजपा माजी नगरसेवक संदीप गायकर यांनी सन 2019 ते 6 सप्टेंबर 2021 या काळात वेळोवेळी चार चाकी वाहनाने पाठलाग करून समाजात व नातेवाईकात बदनामी करेल , चेहऱ्यावर ऍसिड टाकून चेहरा खराब करेल , तुला सोडणार नाही, फिर्यादी महिला आणि मित्र परिवारास जीवे ठार मारण्याची धमकी देऊन अश्लील शिवीगाळ करत जबरदस्तीने हात पकडून विनयभंग करत न थांबता इंस्टाग्रामवर आणि वॉट्स ॲपवर अश्लील मेसेज टाकून बदनामी केल्याप्रकरणी केडीएमसी माजी स्थायी समिती सभापती आणि भाजपा माजी नगरसेवक संदिप गायकर यांच्यावर विनयभंग केल्या प्रकरणी बाजरपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
या प्रकरणात संदीप गायकर तीन महिन्यापासून फरार झाले होते. काल रात्री कल्याण बाजारपेठ पोलिसांनी अलिबाग वरून अटक केली होती. पोलिसांनी अटक करून आज पोलीस बंदोबस्तात कल्याण न्यायालयात हजर करण्यात आलं.न्यायालयाने संदीपला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.संदीपच्या अटकेने राजकीय गोटात एकच खळबळ उडाली आहे.