मयुरेश जाधव | अंबरनाथमधून जाणाऱ्या कल्याण कर्जत राज्य महामार्गावर चुकीच्या पद्धतीने भिंत बांधण्यात आल्यानं तरुणाचा जबडा फाटल्याची घटना घडली होती. या घटनेप्रकरणी भाजप आक्रमक झाली असून उपचारांचा खर्च ठेकेदाराकडून वसूल करणार असल्याचा पावित्रा घेतला आहे.
कल्याण कर्जत राज्य महामार्गावर तीन ठिकाणी रस्त्याखालून गेलेल्या युटिलिटी लाईन्सचे डक्ट उघडे ठेवण्यात आले आहेत. या डक्ट भोवती संरक्षक भिंत बांधण्यात आली असून रस्त्याच्या अगदी मधोमध बांधण्यात आलेल्या या भिंतीमुळे अपघातांची संख्या वाढू लागली आहे. याच भिंतीला धडकून त्रिंबक काळे या तरुणाचा जबडा अक्षरशः फाटला होता. त्यानंतर त्याच्यावर खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आल्या. मात्र त्यानंतर एमएमआरडीए किंवा ठेकेदाराकडून या तरुणाची साधी चौकशीही करण्यात आली नाही. त्रिंबक हा अजूनही उल्हासनगरच्या खासगी रुग्णालयात उपचार घेत असून उपचारांवर आत्तापर्यंत लाखो रुपये खर्च आले आहेत.
आज भाजपचे अंबरनाथ शहराध्यक्ष अभिजित करंजुले यांनी त्रिंबक याची भेट घेत विचारपूस केली.
त्रिंबकचा अपघात हा एमएमआरडीए आणि ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे झाला असून त्यामुळे त्याच्या उपचारांचा खर्च ठेकेदाराच्या बिलातून वसूल करावा, यासाठी प्रयत्न करणार असल्याचं यावेळी अभिजित करंजुले यांनी स्पष्ट केलं. याचबाबत एमएमआरडीएच्या उपअभियंत्यांची त्यांनी भेट घेतली असून उद्या साईट व्हिजिट करणार असल्याची माहिती अभिजित करंजुले यांनी दिली आहे.