राज्यातील ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण (Political reservation to OBC community) मिळावे, यासाठी भाजपने वेळोवेळी आक्रमक आंदोलन करून सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला. मात्र राज्य सरकार या विषयाकडे गांभीर्याने बघत नसल्याने ओबीसी समाजाचा संयम सुटत चालला आहे. दरम्यान आज (25 मे) ओबीसी राजकीय आरक्षणासाठी भाजप आक्रमक झाले असून आज भाजपकडून मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. मराठा आरक्षणासह ओबीसी आरक्षणाकडे ही या सरकारच दुर्लक्ष असल्याचे आंदोलनकर्त्यांच म्हणणे आहे.
तसेच शरद पवार यांनी विकासाच्या नावाखाली जनेतेला गुळ दाखवला आहे. फसवणुक करणं आणि गुळ दाखवणं ही त्यांची परंपरा आहे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. ओबीसी समाज आता याला बळी पडणार नाही. कारण महाविकास आघाडी सरकारला ओबीसींना आरक्षण द्यायचे नाही हे समाजाला कळल्याने ते भडकेले आहेत, म्हणून त्यांनी हे आंदोलन छेडले आहे, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
भाजपा ओबीसी मोर्चा महाराष्ट्र ओबीसी मोर्चा प्रदेश अध्यक्ष योगेश टिळेकर यांच्या नेतृत्वात मध्यप्रदेश सरकारचे अनुकरण करून महाराष्ट्रातील ओबीसी समाजालाही त्यांचे राजकीय आरक्षण परत मिळवून देण्याकरिता थेट मंत्रालयावर धडक देणार आहेत.
ओबीसीवर चंद्रकांत पाटील म्हणाले...
माध्यमांशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, पवार साहेबांनी लोकांना गूळ दाखवणे आणि फसवणे याची मोठी परंपरा आहे. त्यामुळे त्यांच्या गूळ दाखवण्याला ओबीसी समाज भीक घालणार आहे. महाविकास आघाडी आरक्षण देणार नाही हे जनतेला समजले असून ओबीसी समाज भडकला आहे.
आरक्षणाची सध्याची परिस्थिती काय
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. मात्र, दुसरीकडे मध्य प्रदेशचा अहवाल गृहित धरत त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणानुसार घेण्यास परवानगी दिली. मध्यप्रदेशातील ओबीसी आरक्षणाचे पडसाद महाराष्ट्रात उमटू लागले आहेत. महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पेटला आहे.