अभिजीत हिरे, प्रतिनिधी
भिवंडी शहरातील झोपडपट्टी विभागात राहणाऱ्या गरिब नागरिकांच्या अशिक्षितपणाचा गैरफायदा घेत मोठया प्रमाणावर बनावट खाद्यपदार्थ विक्री केल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. याबाबत तक्रारी वाढत असून बनावट जिरे विक्री करणाऱ्यांवर अटकेची कारवाई करण्यात आली होती. अशातच आता बनावट एव्हरेस्ट मसाले विक्री करणाऱ्यांचा शांतीनगर पोलिसांनी पर्दाफाश केला असून दोन जणांना अटक केली आहे. आरोपींकडून १ लाख ८ हजार रुपये किंमतीचा बनावट मसाल्याचा माल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली. महेश लालताप्रसाद यादव, मोहमद सलमान मोहमद अफजल अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
भिवंडी शहरात एका टेम्पोमधून बनावट पॅकिंग केलेला एव्हरेस्ट मसाला विक्रीसाठी येणार असल्याची खबर शांतीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांना मिळाली. त्यानंतर विनायक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुरेश घुगे व पोलिस पथकाने जब्बार कंपाऊंड शांतीनगर या रस्त्यावर सापळा रचला. जोगेश्वरी येथून आलेला एम एच 03 सी डी 0679 हा संशयित टेम्पो थांबवून पोलिसांनी त्याची तपासणी केली.
त्यामध्ये 1 लाख 8 हजार रुपये किमतीचे एव्हरेस्ट चिकन मसाला,एव्हरेस्ट मटण मसाला व मॅगी मसाल्याचा बनावट मालाचे पॅकेट आढळून आले. टेम्पो चालक महेश लालताप्रसाद यादव व माल विक्री साठी आलेला मोहमद सलमान मोहमद अफजल प्रधान दोघे रा. जोगेश्वरी यांना ताब्यात घेत त्यांच्या कडे चौकशी केली असता हा बनावट पॅकिंग माल गुजरात राज्यातील सुरत येथील फॅक्टरी मध्ये बनवून महाराष्ट्रासह गुजरात,मध्या प्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यांत विक्री केला जात असल्याची माहिती समोर आली.
त्यानंतर पोलिस पथकाने सुरत येथील ईश्वरनगर सोसायटी, पर्वतगाव येथे छापा टाकला. करण सुरेशभाई मेवाडा हा बनावट मसाला तयार करीत असल्याचे आढळून आल्याने पोलिस पथकाने तेथील कच्चा माल व मशीन व फॅक्टरी सिल करून कारवाई केली आहे. खऱ्या एव्हरेस्ट मसाले पाकिटावर ई हॉलमार्क असतो परंतु बनावट पाकिटावर असा हॉलमार्क आढळून आला नाही.त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा हा प्रकार असून त्यामुळे एव्हरेस्ट कंपनीच्या सेल्समन यांनी दिलेल्या तक्रारी वरून या दोघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून नागरिकांनी सुध्दा आपण वापरीत असलेले पॅक बंद खाद्य पदार्थ खरेदी करीत असताना त्याच्या खरे पणाची खात्री करून घ्यावी असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी केले आहे.