श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे श्रावणात होणारी यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर याही वर्षी रद्द करण्यात आली आहे. भाविक अगर पर्यटक याकडे दुर्लक्ष करून मंदिराकडे येण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर शासनाचा आदेश मोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
5 पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र आढळल्यास त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. खबरदारी म्हणून डिंभा व पालखेवाडी येथे पोलीसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला असून, प्रशासनाला नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन खेड पोलीस निरीक्षक सतीश गुरव यांनी केले आहे
प्रसिद्ध बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकरमध्ये दरवर्षी मोठया उत्साहात होणारी श्रावणी सोमवार यात्रा यंदाच्या वर्षीही रद्द करण्यात आली आहे. श्रावण महिन्यात भीमाशंकरकडे भाविक व पर्यटक जाऊ नयेत यासाठी पालखेवाडी चेकपोस्ट, डिंभे नाका याठिकाणी चोविस तास कर्मचारी नेमले आहेत.
यावर्षी ९ ऑगस्ट ते 6 सष्टेंबर दरम्यान श्रावण महिना येत असून यामध्ये ता. ९, १६, २३, ३० ऑगस्ट व ६ सष्टेंबर असे पाच श्रावणी सोमवार आले आहेत. भीमाशंकर मधिल श्रावण महिन्याची यात्रा पुरातन काळापासून सुरू आहे. श्रावण महिन्यात भीमाशंकरचे दर्शन पवित्र मानले जात असल्याने पूर्ण एक महिना दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येतात. या यात्रेचे नियोजन प्रशासन व भीमाशंकर देवस्थान ट्रस्ट करत असते.