भिवंडीमध्ये विक्री करण्यासाठी आलेल्या टेम्पोवर शांतीनगर पोलिसांनी धाड टाकून या प्रकरणी दोन जणांना अटक केले असल्याची माहिती भिवंडी पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. शादाब इस्लाम खान वय 33 वर्ष नवलीफाटा पालघर व चेतन रमेशभाई गांधी वय 34 वर्ष कांदिवली पश्चिम असे बनावट जिरे प्रकरणी अटक केलेल्या दोन आरोपींची नावे आहेत.
शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 90 फूट रोड, नागाव फातमा नगर येथे बनावट जिरे येणार असल्याची गुप्त माहिती पोलीस उपनिरीक्षक एस एम घुगे व पोलीस शिपाई क्षीरसागर यांना मिळाली होती. शांतीनगर पोलिसांनी भिवंडी पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे, सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर खैरनार व वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर इंदलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करून नागाव फातमानगर येथे सापळा लावला असता या ठिकाणी पिकअप टेम्पोत बनावट जीरा आढळला. पोलिसांनी टेम्पोतून आणलेल्या 80 गोन्यांमधील 7 लाख 19 हजार 700 रुपये किंमती मधून सुमारे साडेतीन टन बनावट जिरे माल व 4 लाख रुपये किंमतीचा टेम्पो असा सुमारे 11 लाखांचा मुद्देमाल शांतीनगर पोलिसांनी जप्त केला आहे.
वाशी ,नवी मुंबई एपीएमसी मार्केट, भिवंडी, ठाणे आणि आजूबाजूच्या परिसरात तसेच हॉटेल, धाब्यांवर हे जिरे विक्रीसाठी पाठवण्यात येत होते. धाब्यांवार खाल्ला जाणाऱ्या जीरा राईस मध्ये या जिर्याचा सर्रास वापर केला जात असल्याचं देखील समोर आलं होतं. शांतीनगर पोलिसांनी पालघर येथील बनावट जिरा फॅक्टरी सील बंद केले असून आरोपींना न्यायालयात हजर केले. या आरोपींना 27 जानेवारीपर्यंत दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती भिवंडी पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी दिली आहे.