मुंबई : राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पावसाची सुरुवात झाली आहे. मुंबईतही मुसळधार पाऊस पडण्यास सुरुवात झाली असून सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. यामुळे वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे. या पार्श्वभूमीवर बेस्टने काही बसेसच्या मार्गात बदल केला आहे. यासंबंधीची माहिती ट्विटर अकाउंटद्वारे देण्यात आली आहे.
मुंबई शहरासह उपनगरामध्ये कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका आता वाहतुकीला बसत आहे. मुंबईकरांना वाहतुकीची सुविधा पुरवणाऱ्या बेस्टने आपल्या काही मार्गात बदल केले आहेत. चेंबूर व सायन येथे पाणी भरल्याने बसच्या 357, 360, 355 (म) या मार्गात बदल केला आहे. बेस्टने काही बसेसचे मार्ग बदलले बस क्र. ३५७, ३६०, ३५५ (लि) चेंबूर शेल कॉलनी येथून आंबेडकर उद्यान मार्गे, चेंबूर नाका ते सुमन नगर पर्यंत धावणार आहेत. व सायन रोड नं. २४ येथील सर्व बसेस मुख्य मार्गाने धावतील.
तर, मुंबईची लाईफलाईन असणारी लोकल काही सेंट्रल, हार्बर मार्गावरील गाड्या 10-15 मिनिटांपेक्षा जास्त उशिराने धावत आहेत. यासंबंधीची माहिती मध्य रेल्वेच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन देण्यात आली आहे.
दरम्यान, आयएमडीने मंगळवारी महाराष्ट्रात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. दक्षिण कोकण आणि गोव्यासाठी हवामान विभागाने 'ऑरेंज अलर्ट' जारी केला आहे आणि उत्तर कोकण, उत्तर मध्य आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागांसाठी 'यलो अलर्ट' जारी केला आहे.