विकास माने | बीड : कोरोनाच्या सावटानंतर बीड जिल्ह्यात यंदा दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळात आहे. प्रसिद्ध हरियाणी डान्सर सपना चौधरीसाठी बीडमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. आपल्या जीवाची पर्वा न करता तरुणाईने दुकानाच्या छतावर क्रेन मिळेल त्या ठिकाणी बसून सपनाची एक झलक पाहण्यासाठी गर्दी केली.
दीपज्योत ग्रुपच्या वतीने या दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. विनायक मेटे यांचे दोन दिवसांपूर्वी अपघाती निधन झालं. या कार्यक्रमात सुरुवातीला दोन मिनिटं स्तब्ध राहून मेटे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. दोन वर्षानंतर बीडकरांनी दहीहंडीचा अनुभव घेतला आहे. तेरी अखियों का ये काजल.... या प्रसिद्ध गाण्यावर सपनाने ठुमके लगावले, बीडकरांनी देखील याला दाद दिली.
दरम्यान, याआधी देखील परळी मध्ये सपना चौधरीचे ठुमके जिल्हावासियांनी अनुभवले होते. आज मात्र दहीहंडी निमित्त सपना आली असता तिने महाराष्ट्रातील दहीहंडी उत्सव पाहण्याची इच्छा व्यक्त केली. आणि बीडकरांनी तिची ही इच्छा पूर्ण केली.
दुसरीकडे मात्र अतिवृष्टीने शेतकरी संकटात असताना हा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात घेतल्याने पुढारी शेतकऱ्यांचे दुःख विसरल्याचं पाहायला मिळालं. शिवसेना नेते योगेश क्षीरसागर, भाजप नेते भगीरथ बियाणी यांसह विविध पक्षातील मंडळी सपनाचा डान्स पाहण्यासाठी आले होते.