विकास माने , बीड
बीड मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला 'मराठा क्रांती भवन' चा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते भूखंड हस्तांतरण सोहळा आज पार पडलाय. राज्यातील पहिलं मराठा भवन हे बीड मध्ये होत आहे.
बीड शहरातील राजीव गांधी चौक परिसरात या मराठा भवनाची उभारणी होणार आहे. सकल मराठा समाज बीड जिल्हा आणि छत्रपती सकल मराठा विकास संस्थाच्यावतीने याचे आयोजन करण्यात आले. मराठा समाजासाठी हक्काची एखादी जागा असावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत होती. यासाठी मराठा समाजाकडून पाठपुरावा केला जात होता. आज अखेर हा प्रश्न मार्गी लागला आहे.
समाजातील विविध संघटना आणि कार्यकर्त्यांनी गेल्या काही दिवसांपासून माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्याकडे जागेची मागणी लावून धरली होती. त्याच अनुषंगाने 'मराठा क्रांती भवन निर्माण करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या ठिकाणी मराठा समाजातील मुलींसाठी सुसज्ज वसतिगृह, अभ्यासिका आणि समाजातील लोकांसाठी हक्काची जागा या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.