मुंबई : कोकणातील बारसू रिफायनरीच्या सर्वेक्षणाविरोधातील आंदोलनाचा आज पाचवा दिवस असून आंदोलक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. पंचक्रोशीतील ग्रामस्थ याठिकाणी दाखल झाले असून सर्वेक्षण थांबविण्याचा प्रयत्न करत आहेत. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला असून अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या आहेत. यामध्ये काही महिलाही जखमी झाल्याचेही समजत आहे.
रिफायनरिविरोधातील आंदोलन चिघळले असून आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. परिसरात पोलिसांनी मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात केला आहे. परंतु,आंदोलक आक्रमक झाले असून एकच जिद्द रिफायनरी रद्दच्या घोषणा देत सर्वेक्षण परिसरात घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. अशात, पोलिस-आंदोलकांमध्ये झटापट झाली असून त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज करत अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या आहेत. या सर्वाचे पोलिसांकडून ड्रोन व कॅमेराद्वारे व्हिडीओ रेकॉर्डींग करण्यात येत आहे.