मयूरेश जाधव | बदलापुरात एका मृतदेहाची रस्त्याअभावी गुडघाभर पाण्यातून अंत्ययात्रा काढावी लागल्याची दुदैवी घटना घडली आहे. मृत व्यक्तीच्या पुतण्याने फेसबुकवर पोस्ट टाकत ही घटना चव्हाट्यावर आणली आहे. ही घटना पाहता प्रशासन इतक ढीम्म झालं आहे का ? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
बदलापुरात बेलवली सबवेत साचलेल्या गुडघाभर पाण्यातून अंत्ययात्रा काढावी लागली.बेलवली स्मशानात जाण्यासाठी एकच मार्ग उरला होता. याआधी असलेला मार्ग रेल्वेने रेल्वे फाटक बंद करून संरक्षत भिंत घालून बंद केला होता. त्यामुळे स्मशानाकडे जाण्यासाठी बेलवली सबवेचाच मार्ग उरला होता. त्यात बेलवली सबवेत पावसाळयात तसेच परिसरातील इमारतींच्या सांडपाण्याचे पाणी साठत असते. त्यामुळे मृतदेहाची गुडघाभर पाण्यातून अंत्ययात्रा काढावी लागल्याची दुदैवी घटना घडली.
विशेष म्हणजे ही निव्वळ आजची समस्या नसून दररोज अशा समस्येला बेलवली ग्रामस्थांना तोंड द्यावे लागते. रेल्वेने रेल्वे फाटक बंद करून स्मशानाकडे जाण्याचा मार्ग संरक्षत भिंत घालून बंद केला. परंतू आम्हाला पर्यायी व्यवस्था करून दिली नाही असा आरोप फेसबूक पोस्टमध्ये करण्यात आला. तसेच आमच्या या समस्येकडे कोणतंही प्रशासन लक्ष देत नाही नसल्याचे म्हटले. नगरपालिकेच्या मार्फत मुख्याधिकारी यांनी लक्ष घालावे तसेच रेल्वे प्रशासन यांना देखील आमच्यासाठी पादचारी पुलाला परवानगी द्यावी व ही समस्या सोडवावी, अशी मागणी मृत व्यक्तीच्या पुतण्याने फेसबुकवर पोस्ट टाकत केली आहे.