औरंगाबादची धाडसी कन्या आकांक्षा धनंजय तम्मेवारने सर्वात कमी वयात तीन अतिशय अवघड मोटरेबल पास ५०० सीसी रॉयल इन्फिल्ड बुलेट या मोटरसायकलवर पार करण्याचा विक्रम पूर्ण केला आहे.
तिच्या या विक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली असून, तसे प्रमाणपत्र तिला नुकतेच प्राप्त झाले आहे. वयाच्या एकोणिसाव्या वर्षी सर्वात कमी वयात तिने केलेल्या या विक्रमाची नोंद गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही करण्यात आली आहे.
असा केला विक्रम :
आकांक्षा औरंगाबादवरून 3 जूनला निघाली. 6 जूनला श्रीनगरहून तिचा बाईक प्रवास सोनमर्गपासून सुरू झाला. द्रास, कारगिल, सुमेर, नुब्रा, पेंगोंग, सर्चू, जिस्पा ,अटल टनल रोहतांग असा प्रवास करत ती शेवटी मनालीला पोहोचली.जगातील सर्वोच्च उंचीवरील प्रथम क्रमांकाचे खार्दुंगला पास, द्वितीय क्रमांकाचे चांगला पास आणि तृतीय क्रमांकाचे तांगलांगला पास पार करणारी आकांक्षा ही सर्वात कमी वयाची मोटरसायकल रायडर ठरली आहे. यासोबतच सर केलेल्या तिन्ही पाससाठी तिचा विक्रम नोंदविला गेला आहे.
या संपूर्ण प्रवासादरम्यान रक्त गोठवणाऱ्या थंडीतून, दर्या-खोर्यातून, नदीच्या प्रवाहातून, वाळवंटातून, अपुऱ्या ऑक्सिजन असलेल्या वातावरणातून अनेक संकटांवर मात करत तिने 11 दिवस जवळपास 1300 किलोमीटर गाडी चालविली.
जगातील सर्वात कमी वयाची फिमेल बाईक रायडरच्या रूपात तिने खारदूंगला पास पार करण्याचा इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड तीने केला आहे. त्याचबरोबर गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' मध्येही तिच्या नावे या विक्रमाची नोंद झाली आहे. जगातील सर्वोच्च तिन्ही मोटारेबल पास (खारदुंगला, चांगला, तांगलांगला) पार करण्याचा विक्रम तिने वयाच्या १९ वर्षे १८ दिवसांत पूर्ण केला.तिच्या या साहसी उपक्रमाला घरातील सर्व लहानथोर सदस्यांचा पाठिंबा तिला लाभला आहे. यापुढेही असेच अनेक धाडसी उपक्रम करण्याचा तिचा मानस आहे.