हिवाळी अधिवेशानात पहिल्या दिवसापासून विरोध आक्रमक दिसून येत आहे. महाविकास आघाडी सरकारला अनेक प्रश्नावर घेरले आहे. त्याचवेळी एका महिलेने विधानभवानच्या मुख्य द्वारासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले.
राजलक्ष्मी, असे या महिलेचे नाव असून ती नाशिक येथील युवा स्वाभिमान पक्षाची महिला जिल्हाध्यक्ष आहे. नाशिकच्या पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी जाणीवपूर्वक काही गुन्हे त्यांच्या कुटुंबीयांवर दाखल केले आहेत. याप्रकरणी त्यांची वारंवार भेट घेऊन सुद्धा पोलिस आयुक्त सहकार्य करत नाहीत. केवळ आकसापोटी हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, असा आरोप या महिलेने केला आहे. त्याचा निषेध करण्यासाठी आणि न्याय मिळविण्यासाठी तिने आज विधानभवनाच्या मुख्य द्वारासमोर अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्यानंतर तिने माध्यमांशी बोलून तिची व्यथा मांडली. पोलिसांनी तिला वेळीच ताब्यात घेतल्याने दुर्घटना टळली.