अमरावतीमधील दंगल शमत असतानाच आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांची दंगल सूरू झाली आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजप नेते आशिष शेलार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. भाजप नेते आशिष शेलार हे रझा अकादमीच्या कार्यालयात गेले होते. तिथे त्यांनी रझा अकादमीच्या नेत्यांसोबत मिटिंग केली. हा षडयंत्राचा भाग होता का? हे माहीत नाही. पण शेलार रझा अकादमीच्या कार्यालयात गेले होते, असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.
नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत भाजपसह आशिष शेलार यांच्यावर आरोप केले आहेत. भाजपचे सर्व अस्त्र संपतात तेव्हा ते दंगलीचं अस्त्र बाहेर काढतात आणि आपलं राजकारण सुरू करतात. आम्ही या राजकारणाचा निषेध नोंदवतो. त्यांनी अशा प्रकाराचं नकारात्मक राजकारण करू नये. अशा प्रकारचं राजकारण राज्यात चालणार नाही, असे नवाब मलिक म्हणाले आहेत.
ते पुढे म्हणाले, आशिष शेलार रझा अकादमीच्या कार्यालयात बसले होते. माझ्याकडे एक फोटो आहे. हा सुद्धा षडयंत्राचा हिस्सा होता की नाही माहीत नाही. पण राज्यात रझा अकादमीची ताकद नाही. त्यांचे काही मौलाना शहरात फिरत असतात. मात्र, राज्यात दंगल भडकवतील एवढी त्यांची ताकद नाही. पण त्यांच्या कार्यालयात बसून शेलार मिटींग करत होते. त्याची चौकशी होईल. सर्व दंगल करणाऱ्यांना अटक करण्यात येईल, असं मलिक म्हणाले.