आषाढी एकादशी निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंढरपुरात पोहोचले आहेत. पहाटे २.२० वाजता विठ्ठलाच्या महापुजेला सुरुवात होणार आहे. मुख्यमंत्र्यांसोबत यंदाही दरवर्षीप्रमाणे मानाचा वारकरी पूजा करणार आहे. फक्त यावेळी वारकरी दाम्पत्य कोरोनामुळे दरवर्षीप्रमाणे दर्शन रांगेतून निवडलेले नसणार आहे.
श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिरात २४ तास पहारा देणारे विणेकरी यांची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या शासकीय महापूजेसाठी मानाचा वारकरी म्हणून निवड करण्याचा मंदिर समितीने निर्णय घेतला होता. विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पहारा देणाऱ्या एकूण ८ विणेकऱ्यांपैकी २ विणेकऱ्यांना मागी वर्षी आषाढी व कार्तिकी एकादशीला संधी मिळाली होती.
यंदा देखील यापैकी ४ विणेकऱ्यांचा सेवेचा कालावधी एक वर्षापेक्षा कमी असल्याने केशव शिवदास कोलते व बापू साळुजी मुळीक या दोन विणेकऱ्यांपैकी पांडूरंग (ईश्वर) चिट्टीने केशव शिवदास कोलते (वय ७१ वर्षे, रा. मु. संत तुकाराम मठ, वार्ड नं. १५, नवनाथ मंदिर पाठीमागे वर्धा, ता.जि. वर्धा) यांची मानाचे वारकरी म्हणून निवड करण्यात आली आहे.
यामुळे मुख्यमंत्र्यांसोबत केशव शिवदास कोलते आणि त्यांच्या पत्नी इंदूबाई केशव कोलते हे वारकरी दाम्पत्य विठ्ठलाची महापुजा करणार आहेत. कोलते हे मागील २० वर्षापासून मंदिरात विणा वाजवून पहारा देत आहेत.