गेल्या काही दिवसांत देशभरात उन्हाचा तडाखा वाढला (temperature rise) आहे. तर दुसरीकडे बंगालच्या उपसागरात तयार झालेला 'असानी' चक्रीवादळाचा (Cyclone Asani) प्रभाव आंध्र प्रदेश, ओडिशा, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि लगतच्या राज्यांमध्ये पहायला मिळत आहे. हवामान खात्यानुसार, जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.
चक्रीवादळामुळे हवामान विभागाने आंध्रप्रदेशातील तीन जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. या चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रातील महत्त्वाच्या भागांत होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. या चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेशातील अनेक भागात ११ मेला मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या चक्रीवादळामुळे राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात ढगाळ वातावरण असणार आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली तसेच कर्नाटका, केरळमध्ये सुद्धा ढगाळ वातावरणाचा इशारा देण्यात आला आहे.
तसेच आज कोकणात तुरळ ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तर मध्य महाराष्ट्र, उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाडा काही ठिकाणी पाऊस पडू शकतो तर विदर्भात पाऊस आणि उष्णतेचा कहर पाहायला मिळेल. आजच नाहीतर उद्याही राज्यात अनेक भागांत ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.