क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी गेल्या 25 दिवसांपासून एनसीबीच्या कोठडीत असलेल्या आर्यन खानला अखेर जामीन मिळाला आहे. त्याच्यासह मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट यांनाही जामीन मिळाला. मात्र जामीन मिळून सुद्धा आर्यन खानची आजची रात्र तुरुंगातच असणार आहे.
आर्यनच्या न्यायालयात गेल्या तीन दिवसांपासून युक्तिवाद सुरू होता. आज सलग तिसऱ्या दिवशी आर्यनच्या जामिनावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. आर्यनच्या बाजूने ज्येष्ठ मुकूल रोहतगी यांनी जोरदार युक्तिवाद केला. त्यानंतर हा जामीन मंजूर करण्यात आला. आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांचाही जामीन मंजूर करण्यात आला आहे.
साक्षीदार फोडू नये, तपासात अडथळा आणू नये, परवानगी शिवाय शहराबाहेर जाऊ नये, प्रत्येक शुक्रवारी कोर्टात हजर राहावे आदी शर्तीवर त्यांना जामीन देण्यात आला आहे, असं वकिलांनी सांगितलं. आर्यन खानसह तिघांना जामीन मंजूर झाला आहे. निर्णयाची प्रत उद्या मिळणार आहे. त्यानंतर उद्या किंवा परवा आर्यन खानसह तिघेही तुरुंगातून बाहेर येतील, असं मुकूल रोहतगी यांनी सांगितलं.