सूरज दहाट, अमरावती | अमरावतीत ऐन मुलाखतीच्या दिवशी जिल्हा परिषदेची भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्याची घटना घडली आहे. यामध्ये एका जागेसाठी तब्बल ८०० अर्ज दाखल झाले होते. या घटनेने विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली असून विद्यार्थ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे.
राज्यात सध्या विविध स्पर्धा परीक्षांच्या पेपर फुटीमुळे विविध परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. नुकतीच म्हाडा मधील परीक्षा भरती पेपरच्या आदल्या दिवशी रात्री दोन वाजता रद्द करण्यात आली होती. अशाच प्रकारे ऐन मुलाखतीच्या दिवशी अमरावती जिल्हा परिषदेची भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्याच्या माहितीने विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली असून विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
अमरावती जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभाग अमरावती अंतर्गत डेटा एंट्री ऑपरेटर पदाची 1 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. त्यामुळे या जागेसाठी तब्बल ८०० अर्ज दाखल झाले होते. तर आज त्याची मुलाखती करिता उमेदवारांना बोलावण्यात आले होते. मात्र ऐनवेळी मुलखात रद्द झाल्याने विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे.