मुंबई : राज्य शासनाच्या वतीने महाराष्ट्र भूषण 2022चा पुरस्कार ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आला. आप्पासाहेब धर्माधिकीरींचं निस्वार्थ कार्य आहे. समाज सेवेची परंपरा धर्माधिकारींच्या 3 पिढ्यांनी जपली. त्याग आणि समर्पणामुळेच आप्पासाहेबांचा हा सन्मान मिळाला आहे. एका समाजसेवकाच्या प्रेमापोटी आलेला जनसागर प्रथमच पाहिला, अशी स्तुतीसुमने अमित शहा यांनी आप्पासाहेब धर्माधिकारींवर उधळली आहेत.
सार्वजनिक जीवनात समाजसेवा करणारे समाजसेवकासाठी इतक्या लाखो लोकांची गर्दी मी आयुष्यात कधी पाहिली नाही. नजर पोहचणार नाही एवढे मोठे मैदान, त्यानंतर रस्ता व त्या रस्त्यानंतर पुन्हा मैदानात कडक उन्हातही या गर्मीत लाखो माणसे बसलेली आहेत. ही गर्दी सांगतेय की आप्पासाहेब यांच्याबाबत आपल्या मनात किती मान आहे. त्याग, समर्पण व सेवेतून हा भाव निर्माण होतो. आप्पासाहेबांप्रती आपला सन्मान हा नानासाहेब यांच्या शिकवणीचा सन्मान आहे. गर्दीचे अनुकरण करू नका, असे म्हणतात. गर्दीने तुमचे अनुकरण केले पाहिजे. आप्पासाहेब आपण हे करून दाखवले आहे. ही गर्दी आपले अनुकरण करत आहे, असे अमित शहा यांनी म्हंटले आहे.
मी इतिहासाचा विद्यार्थी आहे. लक्ष्मीची कृपा पिढ्यानपिढ्या एखाद्या कुटुंबावर राहते, असे म्हंटले जाते. मी एकापाठोपाठ एक वीर जन्माला येणारे कुटुंब पाहिले आहे. सरस्वतीची कृपाही एकाच कुटुंबात पाहिली. मात्र, समाजसेवेची कृपा प्रथमच पाहत आहे. पिढ्यानपिढ्या समाजसेवेचे व्रत जपणारे हे पहिलेच कुटुंब आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार देत लाखो लोकांना प्रेरणा देण्याचे काम सरकारने केले आहे, असेही ते म्हणाले.
राष्ट्रासाठी मरण्याची वीरतेची धारा छत्रपती शिवाजी महाराज, चाफेकर बंधू, सावरकर, लोकमान्य टिळक अशा विभुतींनी राष्ट्रासाठी आपले आयुष्य खर्च केले. समर्थांपासून नामदेवपर्यंत भक्तीची धारा पाहिली.
तिसरी सामाजिक चेतनेची धारा इथूनच सुरु झाली. महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर हे त्याचे उदाहरण आहे. या सामाजिक चेतना जागृत ठेवत वाढवण्याचे काम नानासाहेब आणि आप्पासाहेब यांनी केले. स्वतःसाठी नाही तर जगासाठी जगण्याची शिकवण आपण दिली. कर्तृत्वाने दिलेली शिकवण चिरंजीवी असते. लाखो लोकांना समाजासाठी काम करण्याची प्रेरणा व शिकवण आपण दिली आहे. देशाला सर्वाधिक गरज असताना दुसऱ्या लोकांसाठी जगणारी फौज तयार केली आहे, असेही त्यांनी म्हंटले.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आप्पासाहेब धर्माधिकारी यांना पद्मश्री पुरस्कार देण्याची आग्रहाची विनंती केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही विनंती मान्य करत पद्मश्री पुरस्काराने आप्पासाहेब यांना गौरविले. आपल्या कर्तृत्वातून तुम्ही समाजास दिशादर्शक ठरत आहात. विविध क्षेत्रात आपण अनेक योगदान दिले. आपले काम दिन दुनी, रात चौगुनी सुरु राहिल, अशी प्रार्थना करतो, अशा भावना अमित शहा यांनी व्यक्त केल्या.