ठाणे : राज्याभरात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाली आहे. तर, नवी मुंबईतही मुसळधार पाऊस सुरु असून रेल्वेसेवा खंडीत झाली आहे. ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या सर्व लोकल विस्कळीत झाल्या आहेत. यामुळे चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले आहेत.
ठाणे शहरात काल पहाटेपासूनच पावसाने वेग धरला आहे. ठाण्याचे दिशेने जाणाऱ्या सर्व लोकल विस्कळीत झाल्या आहेत. डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, कर्जत, कसारा या मार्गावर ठाण्यातून जाणाऱ्या सर्व लोकल तासाभराने उशिरा धावत आहेत. ठाणे रेल्वे स्थानकावरील सर्व इंडिकेटर देखील बंद स्वरूपात आहेत. यामुळे रेल्वे प्रवाशांची तारांबळ उडाली आहे.
तर, ठाणे शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही वंदना बस डेपो, भास्कर कॉलनी येथे पाणी साचले आहे. विशेष म्हणजे ठाणे महानगर पालिका अधिकाऱ्यांनी ठाण्यात पाणी साचते त्या मुख्य ठिकाणी पाहणी करून योग्य ती उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या होत्या. परंतु, असे असताना देखील ठाण्यातील वंदना बस डेपो व भास्कर कॉलनी येथील चित्र दरवर्षी प्रमाणेच जैसे थेच आहे.
दरम्यान, राज्यात पुढील पाच दिवस अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील तीन दिवस मुंबईतील जोरदार पाऊस बरसणार असल्याचा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मराठवाडा वगळता विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकणातील अनेक जिल्ह्यात आज आणि उद्या अतिमुसळधार पाऊस कायम राहणार आहे. तर, आज पुणे, रायगड, पालघर, सातारा या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.