पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अतिमद्यसेवन करून १६ वर्षाच्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हे टोकाचे पाऊल उचलणाऱ्या मुलीसोबत असलेली मैत्रीण बेशुद्धावस्थेत सापडली आहे. तिच्यावर सध्या ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पुण्यातील येरवडा परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. तनिषा शांताराम मनोरे (वय १६) असे मृत मुलीचे नाव आहे. मद्य पार्टीत आणखी एक १६ वर्षीय मुलगी अतिमद्यसेवनामुळे बेशुद्ध अवस्थेत आढळून आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तनिषा येरवड्यातील लक्ष्मीनगर भागात राहायला आहे. ती एका महाविद्यालयात अकरावीत होती. तिची आई भाजी विक्रीचा व्यवसाय करते. सोमवारी (ता. १५) सायंकाळी दोन मैत्रिणींनी तनीषाच्या घरी मद्य पार्टी केली. तनिषाच्या शेजारी राहणाऱ्या एका मुलाला तनिषाच्या मैत्रिणीने दूरध्वनी करून रात्री आठच्या सुमारास बोलावून घेतले. त्यानंतर मुलगा घरी आला. त्याने घरात डोकावून पाहिले. तेव्हा तनिषाने गळफास घेतला असल्याचे उघडकीस आले. त्याने तनिषाला खाली उतरवले. चेहऱ्यावर पाणी मारून तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. त्याने तनिषाच्या आईला या घटनेची माहिती दिली. त्यानंतर तनिषाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झालेला होता.
बेशुद्ध अवस्थेत आढळलेली कीर्ती कमलाकर 16 वर्षे हिने अति मद्यसेवन केलेले असल्यामुळे तिच्या कुटुंबियांनी तिलाही उपचार कामे ससून रुग्णालय येथे दाखल केलेले आहे.
पोलिसांनी पाहणी केली असता या दोघींनी दारू पार्टी केल्याचे समोर आले आहे. दारू पार्टीनंतर त्यांनी उलट्या देखील केल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र या तरुणीने आत्महत्या का केली हे अद्याप समजू शकलेले नाही.