मुंबई : राज्यातील तळीरामांसाठी एक वाईट बातमी आली आहे. दारुची (Alcohol) होम डिलिव्हरी (Home Delivery) आता बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यासंदर्भातील माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली. तसेच, उत्पादन शुल्क विभागाला पत्र लिहून याबाबत सूचनाही दिल्या आहेत.
राज्यात कोरोनाची परिस्थिती निवळल्यानंतर निर्बंध शिथिल करण्यात आले. यानंतर हळूहळू सर्वच सुरु झाले आहे. अनेक कंपन्यानीही आता वर्क फ्रॉम होम बंद करुन ऑफिसमध्ये येण्याच्या सूचना केल्या आहेत. अशातच राज्य सरकारनेही कोरोना काळात परवानगी दिलेली दारुची घरपोच सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. काही परवानाधारक दारू विक्रेत्यांनाच होम डिलिव्हरी करण्याची परवानगी होती. यासंदर्भात उत्पादन शुल्क विभागालाही सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, राज्यात आता पुन्हा एकदा कोरोना विषाणू डोके वर काढत आहे. दररोजच्या रुग्णसंख्येचा वाढता आकडा राज्याची चिंता वाढवणारा आहे. यामुळेच राज्यात पुन्हा मास्कसक्ती लागू होण्याच्या शक्यता निर्माण झाली आहे. नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन राज्य प्रशासनाकडून करण्यात येत आहे. याशिवाय, मंकीपॉक्सचाही धोकाही असल्याने त्यादृष्टीने राज्य सरकारने तयारी सुरु केली आहे.