राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आजपासून जनसन्मान यात्रा सुरु केलेली आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथून या जनसन्मान यात्रेला सुरुवात झाली. यावेळी माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, आम्ही जास्तीत जास्त मतदारसंघामध्ये जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. महायुतीच्या सरकारमध्ये काम करत असताना महत्वाच्या योजना कालच्या अर्थसंकल्पामध्ये आम्ही सादर केलेलं आहेत. त्याबद्दलची माहिती ही आम्हाला शेतकऱ्यांना द्यायची आहे, ती माहिती बहिणींना द्यायची आहे, माय माऊलींना आणि आमच्या मुलींना द्यायची आहे. आमच्या युवा- युवतींना देखील काही योजना आणल्या आहेत त्याबद्दलची माहिती द्यायची आहे. आम्ही सरकारमध्ये काम करत असताना अनेक मागचे कुणी निर्णय घेऊ शकले नाहीत. उदाहरणार्थ आर्टी असेल जसं आम्ही सारथी, महाज्योती, बार्टी या संस्था काढून त्या त्या घटकाला त्यातून न्याय देण्याचा प्रयत्न केला. आम्हाला कुणालाही नाराज करायचे नाही. सगळ्या घटकाला आम्हाला पुढे घेऊन जायचे आहे.
यासोबतच मराठा आरक्षणाबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, त्यासंदर्भामध्ये प्रत्येकाला जे काही योग्य वाटते ते आपली भूमिका मांडतात. त्याबद्दल कुणाचा विरोध असण्याचे कारण नाही. अनेकदा सभागृहामध्ये देखिल एकमताने याबद्दलचे निर्णय झाले. सर्व राजकीय पक्षांनी त्यांना पाठिंबा दिला. सभागृहाने एक मताने पाठिंबा दिला. वेळोवेळी निर्णय घेतलं गेले. परंतु काही निर्णय घेतल्यानंतर दुर्दैवाने हायकोर्टात टिकेलं नाहीत, काही निर्णय हायकोर्टात टिकले तर सुप्रीम कोर्टात टिकले नाही. अशाप्रकारची घटना मागच्या दहा एक वर्षाच्या कारकिर्दीमध्ये घडलेल्या आहेत हे सगळ्यांना पाहिलेलं आहे. आमचा हाच प्रयत्न आहे की, जे काही द्यायचे आहे ते देत असताना ते समाजाला मिळालं पाहिजे त्याबद्दल कुणाचं दुमत नाही परंतु त्याच्यातून ते देत असताना इतरांच्यावरही कुठं नाराजी राहता कामा नये. या पद्धतीने आम्ही पुढे चाललो आहे.
तसेच ते पुढे म्हणाले की, साधारण आता आमच्या तिन्ही पक्षाकडे ज्या ज्या जागा आहेत, त्या त्या जागा त्यांच्याकडे ठेवल्या जातील पण जर काही सीटींग जागा एक्सचेंज करायच्या असतील तर त्या ही प्रकारची तयारी, मानसिकता ही तिन्ही पक्षांनी आणि त्यांच्या मित्रपक्षांनी ठेवलेली आहे. आता त्याला लवकरच अंतिम स्वरुप दिलेलं आपल्या पाहण्यात येईल. त्यानंतर प्रचाराची रणधुमाळी सुरु होईल. असे अजित पवार म्हणाले.