शिवेसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारल्यामुळे महाराष्ट्रामध्ये राजकीय उलथापालथ सुरु झाली आहे. दरम्यान राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडली. दरम्यान शिवसेनेचे 47 आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले. तसेच सत्तेची अडीच वर्ष पूर्ण केल्यानंतर शिवसेनेचे (shivsena) आमदार फुटले. त्यामुळे या प्लॅनमागे उद्धव ठाकरे हेच असल्याचं सांगितलं जात आहे. तशी चर्चा राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियातही आहे. पण ही शक्यता उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी फेटाळून लावली आहे.
मी गेल्या अडीच वर्षांपासून उद्धव ठाकरे यांच्यासोबत काम करत आहे. त्यांचा स्वभाव मी पाहिला आहे. ते असं काही करतील असं वाटत नाही. तो त्यांचा स्वभाव नाही. एखादी गोष्ट करायची असेल तर ते स्वत:हून सागंतात, असं अजित पवार यांनी सांगितलं.
दरम्यान, १७० आमदारांच्या पाठिंब्यावर हे सरकार अस्तित्वात आले. उद्धव ठाकरे सरकारचे प्रमुख असतील हे शरद पवारांनी सांगितले. ज्या पक्षाचे आमदार निवडून आले. त्याच्या मतदारसंघात लुडबूड करायची नाही हे ठरले आहे. स्थानिक पातळीवर काही मतभेद झाले असतील. परंतु आमदारांना कुठेही त्रास होऊ नये असेच प्रयत्न केले आहेत असंही अजित पवारांनी सांगितले.
उद्धव ठाकरेंच्या सोबत राहणार
पक्षाच्या बहुतांश आमदारांचा निर्णय असल्यास पक्षाला निर्णय घ्यावा लागतो. आम्ही शेवटपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहू, असं अजित पवार म्हणाले. ही आताची परिस्थिती निर्माण झाली आहे यातून सरकार पुढं चालवण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार प्रयत्न करतील, असं अजित पवार म्हणाले.